Sun, Feb 28, 2021 06:51




'एवढंच बाकी राहीलं होतं, सोशल मीडियावर 'या' घटस्फोट सोहळ्याची जोरात चर्चा

Last Updated: Feb 23 2021 11:02AM





मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सध्या सोशल मीडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहीलं होत, आता हे ही पाहायला मिळालं, पुणे तिथे काय उणे, पाटलाचा नादच खुळा, लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही, अशा कमेंट्सने तर हाहाकार माजवला आहे. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने साऱ्यांनाच चिंतेत पाडले आहे. असा हा घटस्फोट सोहळा साऱ्यांनाच अचंबित करून सोडणारा आहे. 

चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नाही. 'मंगलाष्टक रिटर्न' या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे, याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. 

चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या चित्रपटांतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्याने तर हाहाकारच माजवला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माता वीरकुमार शहा यांनी सांभाळली आहे. 

'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक,आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्या ही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.

योगेश भोसले हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फोट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. आणि फोटोसह बऱ्याच मनोरंजक अशा कमेंट्सचा माराही पाहायला मिळाला.  

'बाजार' या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक योगेश भोसले प्रेक्षकांच्या समोर आला. 'बाजार' या त्यांनी केलेल्या दिग्दर्शित चित्रपटाला १६ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.