Sun, Aug 09, 2020 01:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायनमध्ये मुंबईची कोंडी ! (video)

सायनमध्ये मुंबईची कोंडी ! (video)

Last Updated: Feb 16 2020 1:49AM
मुंबई : अरविंद कटके
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सायन उड्डाणपुलाच्या बेअरिंग बदलण्याचे काम शुक्रवारी हाती घेत हा उड्डाणपूल पहाटेपासून वाहतुकीस बंद ठेवला. मात्र वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्यामुळे सकाळी दक्षिण मुंबईकडे येणार्‍या आणि दक्षिण मुंबईकडून उपनगरांकडे जाणार्‍या वाहनांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आणि मुंबईकर दीड ते दोन तास या वाहतूक कोंडीत अडकून पडले. दुरुस्तीचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याने सायन मार्ग टाळता आला तर टाळा, असा सल्ला मुंबईत जाणार्‍यांना दिला जात आहे. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 6 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी सायन पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाईल. याउलट सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला असेल. उड्डाणपूल बंद असताना वाहतुकीच्या नियोजनाचे काम मुंबई वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते.वाहतूक पोलिसांनीही गुरुवारी या उड्डाणपुलामार्गे उपनगरांकडे जाणार्‍या आणि उपनगरांकडून दक्षिण मुंबईकडे येणार्‍या वाहन चालकांसाठी मार्गांमध्ये बदल केला होता. मात्र नियोजनाप्रमाणे वाहतूक पोलिसांनी अंमलबजावणीच केली नसल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाले. परिणामी, सकाळी कार्यालयांकडे निघालेले मुंबईकर लांबच-लांब रांगा लागलेल्या वाहतूक कोंडीत अडकले. पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाविरोधात बहुतेक प्रवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडीचा मोठा फटका सायन रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना, शालेय विद्यार्थ्यांना, बेस्टने प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना सहन करावा लागला.

परतीचा मार्ग कोंडीतूनच

सायन उड्डाणपुलाच्या दुरूस्तीच्या पहिल्याच सायंकाळी मुंबईकरांचा परतीचा प्रवास खूपच बिकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शुक्रवारचा दिवस संपवून उपनगराकडे निघालेल्या मुंबईकरांना परळ ते सायन या 6 किलोमीटरच्या परतीच्या प्रवासासाठी तब्बल सव्वातास खर्ची घालावा लागला. सायन सर्कलपासून सुरू झालेली वाहनांची कोंडी माटुंगामार्गे, दादरनंतर परळपर्यंत पोहचली. त्यामुळे वाहन चालकांनी मिळेल त्या मार्गाने सायन ओलांडण्याचा प्रयत्न केला. 

त्यात काहींनी परळहून थेट शिवडी येथील रफी अहमद किडवाई मार्गाची वाट धरली. तर बहुतेक वाहन चालकांनी ईस्टर्न फ्रीवेचा मार्ग धरला. याउलट ईस्टर्न फ्री वेवरील वाहतुकीत सीएसएमटीकडून येणार्‍या वाहनांची भर पडल्याने नेहमीच्या तुलनेत या मार्गावरही चालकांना कोंडीचा सामना करावा लागला.

भायखळाकडून उपनगराकडे निघालेल्या वाहनचालकांनीही चार रस्त्याची कास धरत वडाळा उड्डाणपुलावरून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मार्गाने प्रवास करणे पसंत केले. याउलट बहुतांश वाहनचालकांना कोंडीची कल्पनाच नसल्याने सायनपर्यंत कोंडीत अडकावे लागले. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कोंडीची कल्पना असलेल्या चालकांनी लालबागनंतर सायनला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने प्रवास करणे टाळले.