Thu, Dec 03, 2020 07:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बार, हॉटेल्स रात्री १० पर्यंत

बार, हॉटेल्स रात्री १० पर्यंत

Last Updated: Oct 08 2020 1:31AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पर्यटन विभागाने राज्यातील हॉटेल आणि बार सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रकच बुधवारी जारी केले आहे. लॉकडाऊनमुळे  सहा महिन्यांपासून रुळावरून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टस्, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, विविध जिल्ह्यांतील प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळेमुळे हॉटेल-बार मालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या नाराजीची दखल घेऊन पर्यटन विभागाने वेळ वाढवून दिली आहे.

5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि फूडकोर्ट  50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत शनिवारी आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली. मात्र, हॉटेल, बार उघडण्याची तसेच बंद करण्याच्या वेळा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. आता रात्री 10 पर्यंतची मुभा देतानाही कोरोनाची  परिस्थिती पाहून यावेळेत बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.