Sat, May 30, 2020 14:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद! 

कोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद! 

Last Updated: Apr 01 2020 7:35PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊनच्या आठव्या दिवशी वसई-विरार शहरात कोरोना बधितांचा आकडा आठवर गेल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखला जावा या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वसई, विरार व नालासोपारा या तिन्ही शहरातील कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर बंद करून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 

अधिक वाचा : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेघर, स्थलांतरीत मजुरांची घेतली भेट 

गेल्या आठ दिवसांत वसई-विरार शहरामध्ये आठ कोरोना पॉझिटिव्ह बाधितांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे रुग्ण आढळलेल्या परिसरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची दाट भीती व्यक्त होत आहे. हे आठही जण वेगवेगळ्या परिसरात राहतात. त्यामुळे उपाययोजना म्हणून हे आठ कोरोनाबाधित लोक ज्या परिसरात राहतात तो परिसर पोलिस प्रशासनाकडून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामध्ये वसईतील एव्हर शाईन सिटी परिसर, विरार मधील गोकुळ टाऊनशीप, नालासोपारा येथील निळेगाव आणि वसईतील साईनगर परिसर यांचा समावेश आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर निघणाऱ्या नागरिकांना पोलिसी खाक्या दाखविण्यात येत आहे. 

अधिक वाचा : 'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना बाधितांची जागा आयसोलेट करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करण्याची मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बाहेर निघू नका, असे आवाहन वसईचे अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले आहे.

अधिक वाचा : केंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर; सहा महिन्यात ४ लाख ८८ हजार कोटींचे कर्ज घेण्याच्या तयारीत!