मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 13 सप्टेंबरपासून महाजनादेश यात्रेच्या तिसर्या टप्प्याला प्रारंभ करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून ही यात्रा सुरु होणार असून 19 सप्टेंबरला नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे. तिसर्या टप्प्यात मुख्यमंत्री उत्तर व महाराष्ट्रासह कोकण पिंजून काढणार आहेत.
तिसर्या टप्प्यात ही यात्रा 13 जिल्ह्यातील 60 विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 528 किलो मीटरचा प्रवास करणार आहे. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वैभव पिचड यांच्या अकोले मतदारसंघात जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री तिसर्या टप्प्याच्या यात्रेला सुरुवात करणार आहेत. अहमदनगरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदार संघ आणि राहुरीतही मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत.
14 तारखेला यात्रा श्रीगोंदा, दौंड बारामती, उरळी कांचन, हडपसर मार्गे पुण्यात मुक्कामी येणार आहे. तर 15 तारखेला पुणे, भोर येथून यात्रा सातारा जिल्ह्यातील वाईत प्रवेश करेल. सातारा आणि कराड येथे मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहेत. ते कराडलाच मुक्काम करतील. तर 16 तारखेला यात्रा सांगलीत इस्लामपूर, पलूस, तासगाव, मिरज मार्गे प्रवेश करेल. याच दिवशी जयसिंगपूर, इचलकरंजी, हातकणंगले मार्गे महाजनादेश यात्रा कोल्हापूरला मुक्कामी येणार आहे.