Thu, Aug 06, 2020 03:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चाचण्या वाढविल्याने रुग्णवाढ : राजेश टोपे

चाचण्या वाढविल्याने रुग्णवाढ : राजेश टोपे

Last Updated: Jul 05 2020 1:32AM
मुंबई : दिलीप सपाटे

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्या वाढणार आहे. मात्र आमचा प्रयत्न हा मृत्युदर रोखण्याचा आहे. त्यासाठी आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याचेअसे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  राज्यात रूग्ण संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे, असे ते म्हणाले. 

राज्यात शनिवारी सर्वाधिक 7 हजार 74 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत चलल्याने कोरोनाचे संकटही गंभीर बनत चालले आहे. त्याबाबत राजेश टोपे यांना विचारले असता ते म्हणाले,   पूर्वीपेक्षा कोरोना टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. टेस्ट वाढल्या तसे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही वाढविण्यात आले आहे. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर किमान निकटच्या 15 जणांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे टोपे यांनी सांगितले. 

आता आपण अनलॉककडे जात आहोत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असून रुग्णवाढ ही अपेक्षीत आहे. मात्र त्यामुळे कोणावर मृत्यू ओढवू नये हे प्रयत्न आहेत. जास्तीत जास्त बेड्स, डॉकटर्स, संशयितांना विलगीकरण करण्याची व्यवस्था आणि अन्य सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. इतर राज्यात महाराष्ट्राएवढ्या कोरोना चाचण्या होत नसल्याने रुग्ण संख्या दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.