Sun, Oct 25, 2020 08:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही वाटा

वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही वाटा

Last Updated: Aug 11 2020 10:53PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे मुलींनाही समान वाटा मिळणार आहे. मुला-मुलींच्या समान वाटपाबाबत बराच वाद सुरू होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यासंबंधीचा ऐतिहासिक निकाल सुनावला. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान वाटा मिळेल, असा निकाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने सुनावला. कुठल्याही स्थितीत हा निर्णय लागू राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

वडिलांच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावाप्रमाणे समान वाटा मिळेल, असे 2005 मध्ये अधिनियमित केले गेले होते. नियमांन्वये मुला-मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्‍क मिळतील. परंतु, 2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल तर त्यांना याचा लाभ मिळेल की नाही? हे कायद्यातून स्पष्ट होत नव्हते. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल, असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असतील, तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असे खंडपीठाने स्पष्ट केले  आहे. प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्‍न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो; पण मुलगी ही कायम मुलगीच असते, असे न्या. मिश्रा यांनी स्पष्ट केले. पूर्वी 1956 च्या कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीचा हिस्सा मिळत होता.

परंतु, 2005 मध्ये केंद्र सरकारने यात बदल केला. त्यानुसार 2005 सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळेल, असा बदल करण्यात आला होता. आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुली आता हक्‍काने त्यांचा वाटा मागू शकतील.

वडिलांंचा हयातीचा तसेच मृत्यूचा मुद्दा संपला

मुलीचा जन्म व विवाहाचा मुद्दाही निकालात

कुठल्याही स्थितीत निर्णय लागू होणार 

मुलगी ही कायमच मुलगी असते; न्यायालयाने केले स्पष्ट 

 "