Thu, Aug 06, 2020 04:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मूर्ती नाही म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करावी लागणार?

मूर्ती नाही म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करावी लागणार?

Last Updated: Jul 05 2020 1:43AM
मुंबई : चेतन ननावरे

लॉकडाऊनमुळे अनेक मूर्तिकारांना कारागीर, शाडूची माती, प्लास्टर मिळण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय गणेशमूर्तीच्या उंचीचा प्रश्न उशिराने निकाली निघाल्याने अनेक मूर्तिकारांनी अद्याप मूर्ती तयार करण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे यंदा 40 टक्क्यांहून अधिक भाविकांना मूर्ती मिळणे कठीण असल्याची माहिती मूर्तिकारांकडून मिळत आहे. याशिवाय मूर्तीच्या किमतीत यंदा 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मूर्तीची उंची चार फुटापर्यंत मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र या उंचीच्या मर्यादेबाबत निर्णय घेण्यास फारच उशीर झाल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदीची अंमलबजावणी पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या यंदा आहे त्या मूर्तींची विक्री करताना नव्याने मूर्ती घडवणार नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. परिणामी, शाडूच्या मूर्ती घडवण्यावर मूर्तिकारांचा अधिक भर आहे. 

मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडूची मूर्ती तयार करण्यास अधिक वेळ आणि कष्ट खर्चावे लागत आहेत. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री करणार्‍या मूर्तिकारांकडून यंदा सर्वच भक्तांना मूर्ती पुरवणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे.

मूर्तीच्या किमतीबाबत सांगताना मूर्तिकार म्हणाले की, दरवर्षी साधारणतः 10 टक्क्यांपर्यंत मूर्तीची किंमत वाढते. मात्र यंदा लॉक डाऊनमुळे बरेच कारागीर गावाकडे गेलेले आहेत. त्यामुळे कारागिरांची कमतरता असून चढ्या भावाने कारागीर काम करत आहेत. याशिवाय मातीचे दर आणि इतर साहित्याच्या दरातही वाढ झालेली आहे. परिणामी, यंदा 30 ते 40 टक्क्यांपर्यंत मूर्तीच्या किमती महागण्याची शक्यता आहे. त्यात शासन आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुतेक मूर्तिकारांना सार्वजनिक मंडळ आणि घरगुती गणपतीच्या मूर्तींची ऑर्डर येण्यास आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात सुरू होणारे काम जूनपासून सुरू केल्यास पूर्ण करणे कठीण आहे. म्हणूनच शासनाच्या आदेशातील दूरदृष्टीच्या अभावाचा फटका गणेशभक्तांना बसणार आहे. यंदा मूर्तींचा तुटवडा आणि किमती महागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, बहुतेक भक्तांना गणेश मूर्तीअभावी सुपारी किंवा घराच्या देव्हार्‍यातील चांदीची मूर्ती किंवा फोटो पूजावा लागेल, अशा प्रतिक्रिया मूर्तिकारांनी व्यक्त केल्या आहेत.
 

फक्त इको-फ्रेंडली मूर्तीचीच ऑर्डर
जागेअभावी मर्यादित ऑर्डर घेणार असून अद्यापपर्यंत दरवर्षीच्या तुलनेत 50 टक्के ऑर्डर आल्या आहेत. यंदा फक्त शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींची ऑर्डर घेत आहे. सार्वजनिक मंडळांना सव्वातीन फुटांची मूर्ती साकारून देणार आहे. लॉकडाऊनमुळे कारागिरांना मूर्तिशाळेत पोहोचण्यापासून इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. मेटरियल महागल्याने मूर्तींच्या किमतीत यंदा नाइलाजास्तव वाढ करावी लागत आहे.
- मंगेश सारदळ, मूर्तिकार

महाडमध्ये 1 ते अडीच फुटांपर्यंतच्या 550 मूर्ती आणि 3 ते साडेतीन फुटांच्या सुमारे 50 मूर्ती पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत. परिणामी, नेहमी ऑर्डर असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील निम्म्या मंडळांना नियमाप्रमाणे कमाल साडेतीन फुटांपर्यंतची मूर्ती मिळेल. याउलट उरलेल्या मंडळांना एक ते दीड फुटापर्यंतच्या मूर्तींवर समाधान मानावे लागेल. कारण मोठ्या संख्येने साडेतीन फुटांपर्यंतच्या शाडूची मूर्ती तयार केल्यास त्या सुकण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
- रेश्मा विजय खातू, मूर्तिकार

गेल्या 15 दिवसांपासून मुंबई महापालिकेकडे मूर्ती कार्यशाळांना रितसर परवानगी द्यावी, म्हणून खेटे घालत आहोत. मात्र परवानगी देणार की नाही, याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. पावसाने मुंबईत जोर धरला असून त्याचा परिणाम मूर्ती सुकण्यावर होणार आहे. आजघडीला मूर्ती तयार करण्यास सुरुवात केल्यानंतरही भक्तांची मागणी पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे निश्चितच मूर्तींचा तुटवडा भासून त्यांच्या किमती वाढणार आहे. तयार मूर्ती विक्री करायची म्हटले, तरी मूर्तिकारांकडे पुरेशी जागा नाही. त्यामुळे ऑर्डर घेतलेले मूर्तिकार मोठ्या संकटात सापडलेले आहेत. महापालिकेने परवानगी देण्यासाठी मूर्तिकारांसमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. 
-गजानन तोंडवळकर, अध्यक्ष-बृहन्मुंबई मूर्तिकार संघ