Sun, Sep 27, 2020 03:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा विचार!

खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा राज्य सरकारचा विचार!

Last Updated: Jun 05 2020 10:07PM

file photoमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या संकटकाळात मुबलक रुग्णवाहिकेची आवश्यकता असतानाही शहरात पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा विचार असल्याची माहिती राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाने आज, शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली.

शहरात खासगी आणि सरकारी मिळून ३ हजार रुग्णवाहिका असून यातील १०० रुग्णवाहिका कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने रूग्णांना रुग्णलयांमध्ये पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. रुग्णवाहिकांच्या अपुर्‍या संख्येकडे सरकार दुर्लक्ष करीत असून ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि पालिका प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली. शहरात पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा विचार करण्यात येत आहे. तसेच आरटीओच्या संकेतस्थळावर खासगी रुग्णवाहिका चालकांचे नंबर प्रकाशित करण्याच्या सूचना शासनामार्फत देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

न्यायालयाने या युक्तीदाव्यानंतर याचिकेची पुढील सुनावणी ९ जून पर्यंत तहकूब केली.

 "