होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत; राऊतांचे आव्हान

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत; राऊतांचे आव्हान

Last Updated: Jan 15 2020 2:48PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन

 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे आव्हान दिले आहे. यासोबतच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपालाही संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

उदयनराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर शरसंधान सोडले होते. शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोप उदयनराजेंनी केला होता. शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. 

उदयनराजेंवर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले, उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. असा टोला लगावत गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही, अशी माहिती देखील राऊतांनी यावेळी दिली.

आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेले, असेही यावेळी ते म्हणाले. 

तसेच, उदयनराजेंनी शरद पवारांवर जाणता राजा यावरून अप्रत्यक्षपणे केलेल्या टिकेची दखल घेत शरद पवार जाणते राजे आहेतच. त्यांना जनतेने ही उपाधी दिली असल्याचे राऊतांनी सांगितले. शिवसेना प्रमुख स्वत: म्हणाले नाहीत की आपण हिंदूह्रदयसम्राट आहोत. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, लोकांनी त्यांना राजा मानले. महाराष्ट्रात देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस जनतेचा राजा आहे. आम्हीही शरद पवारांना तो मान देतो,” असे उत्तर यावेळी त्यांनी दिले.