Thu, Jan 21, 2021 01:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय?; शिवसेनेचा शहांना सवाल

'१९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय?'

Last Updated: Jun 30 2020 10:38AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

भारत- चीन संघर्षानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, एका मुलाखती दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी चीनच्या मुद्यावर कोणत्याही चर्चेला घाबरत नाही. 1962 पासून हिंदुस्थान-चीन संबंधांवर आपण संसदेत बोलायला तयार आहोत असे वक्तव्य केले होतो. शहा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? असा  सवाल उपस्थित केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  केलेल्या भारत- चीन संघर्षावर केलेल्या वक्तव्यांवरही भाष्य केले आहे. 

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत शहा यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत चीनच्या मुद्यावर कोणत्याही चर्चेला घाबरत नाही. १९६२ पासून हिंदुस्थान-चीन संबंधांवर आपण संसदेत बोलायला तयार आहोत,’ असे जाहीर केले होते. 

शहा यांच्या या वक्तव्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करत, खरे म्हणजे, १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? विसरा तो भूतकाळ, असे म्हटले आहे. तसेच, चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करून राष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे. पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ सालात का रांगताय? असा खोचक सवाल करत आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे असा टोला शहा यांना लगावण्यात आला आहे. 

यासोबतच भाजप पक्षातील अन्य नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे शिवसेनेने निशाणा साधला आहे. कोरोना व्हायरसशी आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही!’ जसा या ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी.  

सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे. आपल्याला चीनशी लढायचे आहे हे बहुतेक सगळेच विसरलेले दिसतात, असा टोला लगवण्यात आला. 

देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही. पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. असा दावा करत चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो. 

तसचे,  चीनप्रश्नी राजकारण कोणीच करू नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील. चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग २० जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच अशी आठवणही  सेनेने करून दिली.