मुंबई : पुढारी ऑनलाईन
'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. याच वादात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला होता. यावरून शिवसेनेनं मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.
वाचा : म्हणून शरद पवारच 'जाणता राजा'; आव्हाडांचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे. 'पवारांना जाणता राजा कसे म्हणता?' हा प्रश्न त्यांनी नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. छत्रपती शिवरायांना रजतेचा राजा असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडान्खडा माहित असलेला लोकनेता म्हणजे 'जाणता राजा' हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुनगंटीवार यांच्यावर करत शरद पवारांचं कौतूक केले आहे.
वाचा : जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा टोला
शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला व पेटून उठला. पंडित नेहरू असतील, नाहीतर मोरारजी देसाई, सगळ्यांनाच शिवरायांपुढे नतमस्तक व्हावे लागले. आताही तेच झाले. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत, अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.
पवार जाणता राजा कसे? असा प्रश्न उभा केल्यानं 'आज के शिवाजी : नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही. मधल्या काळात भाजपच्या काही नेत्यांच्या मागेही 'जाणते राजे' अशा उपाध्या हौसेने लावण्यात आल्या. पण कुठे शिवाजी राजे व कुठे हे सर्व हवशे नवशे गवशे!, अशा शब्दांत शिवसेनेने टीका केली आहे.