Mon, Jan 18, 2021 15:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोड बोलून शिवसेना संपवण्याचा डाव : उद्धव

गोड बोलून शिवसेना संपवण्याचा डाव : उद्धव

Last Updated: Nov 09 2019 12:41AM

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या आरोपांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे उमुंबई : खास प्रतिनिधी
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या वक्‍तव्यांचा आधार घेत ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. त्यामुळे अशा खोटारड्या शहा आणि कंपनीसोबत आम्हाला राहायचे नाही. गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असून त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. या गोष्टींमुळेच आपण चर्चा थांबवली असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द ठाकरे यांना देण्यात आला नव्हता. याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर संतापलेल्या उद्धव यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकेचे फटकारे ओढले.

आपल्याला खोटे ठरवणार्‍या फडणवीस यांच्याशी बोलण्याची इच्छा नसल्याने त्यांचे फोन आपण घेतले नाहीत, असे स्पष्ट करताना जे काळजीवाहू आहेत, त्यांनी मला खोटे ठरवण्याचा प्रयत्नदेखील करू नये. भाजपने सतत भूमिका बदलण्याचा प्रकार केला आहे. दिलेला शब्द मी फिरवलेला नाही. ‘मातोश्री’वर जेव्हा अमित शहा आले होते तेव्हा जे काही ठरले होते ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक आहे. त्यानंतर फडणवीस यांनीच हे गुपित ठेेवण्याची विनंती आपल्याला केली होती, असेही उद्धव म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन हे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिले होते. तसे मी अमित शहा यांना सांगितले होते. त्यांनी ज्याच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री असा प्रस्ताव ठेवला. त्यास मी नकार दिला होता. कारण तसे ठरले तर एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा खेळ होऊ शकतो. त्यामुळे समसमान जागावाटप केले तरच ते शक्य होईल, असे मी म्हणालो होतो. आमचे आले तर तुम्ही कन्सिडर करा, आमचे आले तर आम्ही करू, असे अमित शहा म्हणाल्यानंतर तसे तुमच्या राज्यातल्या नेत्यांना सांगा, असे मी शहा यांना सांगितले होते. इतके होऊन देखील फडणवीस आता मला खोटे ठरवत आहेत, याबद्दल ठाकरे यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले.

संख्याबळ नसताना भाजपचे सरकार येणार, असे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्‍वासाने कसे सांगतात? सत्ता आल्यास पदाचे आणि जबाबदार्‍यांचे समान वाटप होईल, असे सांगणार्‍यांनी मुख्यमंत्री हे पद त्यात येत नाही काय हे स्पष्ट करावे, असे उद्धव म्हणाले. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करू नका, वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेल असे म्हटले होते. तसेच आत्ता सांगितले तर पक्षात माझी अडचण होईल असे नमूद केले होते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मी खोटारडेपणाचा शिक्का घेऊन शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असे म्हटले तर एकवेळ ठीक आहे. पण ठरलेच नाही हे सहन करणार नाही. ज्यांनी ज्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर अत्यंत जहरी टीका केली, त्यांच्याच सोबत  भाजपने कशी सरकारे स्थापन केली याचे दाखले म्हणून उद्धव यांनी दुष्यंत चौटाला आणि अन्य नेत्यांनी केलेेल्या भाषणांच्या चित्रफितीच दाखवल्या.

 फडणवीस यांचा उपहासाने काळजीवाहू मुख्यमंत्री असा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात मी काहीही बोललेलो नाही, शब्द देऊन फिरवण्याची वृत्ती शिवसेनेची नाही तर भाजपची आहे, अशी बोचरी टीका उद्धव  यांनी केली.

 खोटे बोलण्याचा हिशेब काढला तर अच्छे दिन, नोटाबंदीपासून कोण खोटे बोलले हे दिसेल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. माझ्याशी न बोलता सातार्‍याची जागा घेतली असा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. उदयनराजे मोदींना काय म्हणाले होते, त्यांनी कोणते पेढे वाटले? हे देखील तपासून पाहा, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

 आपला उल्लेख छोटा भाऊ म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दोनवेळा केल्याने कुणाचा पोटशूळ उठला असेल तर त्यावर काय बोलणार? असा टोमणा त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता मारला. शिवसेना भाजपला शत्रू मानत नाही, मात्र त्यांनी खोटे बोलू नये असे ते म्हणाले.