संजय राऊतांनी फडणवीसांना करून दिली 'त्या' कुंडल्यांची आठवण

Last Updated: Nov 28 2020 3:12PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

ठाकरे सरकरला आज वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही'', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या टीकेवर पलटवार करत खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांनी त्यांच्या सत्तेकाळात केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. 

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पाहिली. विरोधी पक्षांनी त्यांच्या पद्धतीने आजचा दिवस सादर केला. त्यांच्या भावनांचा आदर करतो, असे संजय राऊतांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचं एक विधान ऑन रेकॉर्ड आहे. देवेंद्र फडणवीसांनी सर्वांच्या कुंडल्या माझ्या हातात असल्याचे विधान केले होते. विरोध करणाऱ्यांच्या तुम्ही कुंडल्या जवळ ठेवल्या, मग ती कोणती भाषा, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकार टीकेचा भडीमार केला होता.  ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशनदेखील केले.