मुंबई : पुढारी ऑनलाईन
मुंबईच्या आंदोलनाला भेंडीबाजाराशी जोडणं दुर्दैवी आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आक्षेप घेणाऱ्या भाजप नेते प्रविण दरेकरांचा खरपूस समाचार घेतला. शरद पवार यांनी आज दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कधी काळी मी विरोधी पक्षनेता होतो, याचं वाईट वाटतं, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
वाचा - शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष, पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांनी तलवारी उपसल्या
पवार म्हणाले, कृषी कायद्यांची चर्चा २००३ पासून सुरू आहे. कृषी कायदे आणताना सविस्तर चर्चा आणायला हवी होती. शेती विधेयकं सिलेक्ट कमिटीकडे पाठवणं गरजेचं होतं. गोंधळामध्ये कृषी विधेयकं पास केली गेली. शेतकरी ज्या प्रकारे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले, त्याकडे पाहताना सरकारने सामंजस्याने पाहणे गरजेचे होते. पण, तसे घडले नाही. केंद्राने आधीचं योग्य मार्ग काढायला हवा होता.
शेतकऱ्यांवर जाचक अटी लादल्या गेल्या. कायद्यात काही जाचक अटी टाकल्या गेल्या. आजच्या घटनेचं मी समर्थन करत नाही. दिल्लीत जे काही झालं, त्याचं समर्थन करता येणार नाही. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. अजूनही केंद्राने शहाणपणा दाखवावा. केंद्राने थोडा संयम दाखवावा. केंद्राने टोकाची भूमिका सोडावी, शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असेही ते म्हणाले.
बळाचा वापर करून काही साध्य होणार नाही. पुन्हा अस्वस्थ पंजाब निर्माण करू नका. सरकार-शेतकरी यांच्यात चर्चा होणं गरजेचं आहे. हा संवाद तुटू नये. देशावर संकट आली तेव्हा पंजाब सर्वात पुढे होता, असेही पवार यांनी नमूद केलं.