थेट दिल्लीत एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला!

Last Updated: Dec 09 2019 5:20PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षावर कडाडून प्रहार करत असलेल्या एकनाथ खडसेंनी निर्णायक भूमिका घेतली आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. थेट दिल्लीत एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. पवारांच्या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट झाली आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे. पाचच्या सुमारास एकनाथ खडसे पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

त्यामुळे एकनाथ खडसे राज्याच्या राजकारणात भूकंप करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.  विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर आणि परळीमधील पंकजा मुंडे यांच्या पराभवाला स्वकीय जबाबदार असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्याचबरोबर ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा घणाघातही त्यांनी भाजपवर केला आहे.  

नुकत्याच जळगावमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पराभवाला कारणीभूत असणाऱ्यांचे पुरावे दिले असल्याचे एकनाथ खडसे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. 

मला निर्णय प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे, कोअर कमिटीमधूनही बाजूला करण्यात आले आहे. जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमातून मला बाजूला ठेवले जात आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी तयार आहे. मात्र, माझ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे, मी पण माणूस आहे, मी काही देव नाही. त्यामुळे मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा सुचक इशाराच खडसे यांनी बैठकीनंतर दिला होता.