'शालेय विद्यार्थ्याच्या वजनाच्या केवळ दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असावे'

Last Updated: Nov 28 2020 1:07PM
पूर्व प्राथमिकच्या वर्गांना दप्तरच नाही; केंद्राचे धोरण

मुंबई: पुढारी वृत्तसेवा

शालेय विद्यार्थ्याच्या वजनाच्या केवळ दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असावे, तर पूर्व प्राथमिकच्या वर्गांना दप्तरच नको, अशा प्रमाणे कार्यवाही व्हावी, अशा सूचना केंद्रीय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘स्कूल बॅग धोरण 2020’ मध्ये करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना होणारा दप्तराचा शारीरिक ताण कसा कमी करता येईल याचा विचार सरकारदरबारी सुरू होता. दप्तराच्या ओझ्यामुळे काही मुलांना पाठदुखीचा आजार जडला होता. याविरोधात पालकांनी तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. यानंतर 2018 मध्ये केंद्र सरकारने दप्तराचे ओझे किती असावे याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीमध्ये राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर हेही सहभागी होते.

समितीने दिलेल्या अहवालाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता याची अंमलबजावणी देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करावी अशा सूचना केंद्र सरकारचे सचिव सुनीता शर्मा यांनी दिल्या आहेत. शिक्षकांनी नियमितपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे, दप्तराचे आझे वाटणार नाही याप्रमाणे वेळापत्रक आखावे, वर्गात पाठ्यपुस्तके शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी व पिण्याच्या पाण्याची सोय करावी व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करतानाही वजन वाढणार नाही याचा विचार व्हावा अशा सूचना धोरणात आहेत.