Fri, Sep 18, 2020 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी 

रायगड : सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी 

Last Updated: Aug 05 2020 11:25AM
जनजीवन विस्कळीत 

पोलादपूर : पुढारी वृत्तसेवा 

गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यात नद्या-नाले धबधबे तुडूंब भरून वाहत आहे. तर उत्तर वाहिनी सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे रहदारीच्या रस्त्यावर नदी पात्राचे पाणी वाढत आहे. पावसाचा जोर असल्याने प्रशासन सतर्क झाले असून पोलादपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव हे स्वतः पोलिस टीमसह आणि नायब तहसीलदार समीर देसाई हे स्वतः आपल्या टीमसह रात्री उशिरापर्यंत शहरात फेरफटका मारून परिस्थितीची पाहणी करत होते.

पोलादपूर तालुक्यातील गेल्या २४ तासांत २०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत २०६४ मिमी पाऊस झाला आहे. महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने उत्तर वाहिनी सावित्री नदी दुथडी भरून वाहत आहे. 

मुसळधार पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत पोलादपूरमध्ये २०८ मिमी पाऊस पडल्याने पोलादपूर तालुक्यातील कामथी, ढवली, चोळई, उत्तर वाहिनी सावित्री भरून वाहू लागल्या आहेत. 

महाबळेश्वर येथील पावसाचे पाणी सावित्री, पोलादपूर मार्गे महाड येथून पुढे बाणकोट खाडीला मिळत आहे. मोठी समजली जाणाऱ्या सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 

 "