Fri, Apr 23, 2021 13:38
अनिल परब बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाहीत: संजय राऊत

Last Updated: Apr 08 2021 10:44AM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

परमबीर सिंगांपाठोपाठ आता सचिन वाझेच्या पत्रामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीला अडचणीत आली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची पाठराखण करत अनिल परब बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाहीत. कारागृहातून पत्र लिहून घेऊन राज्याला बदनाम करण्याचा नवा ट्रेंड सुरू असल्याचे राऊत यांनी  म्हटले आहे. 

निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने 'एनआयए'ला एक पत्र लिहिले होते. ते एका इंग्रजी वृत्तसंस्थेला मिळाले. या पत्रात राज्‍याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्‍या नावाचाही उल्‍लेख आहे. याबाबत राऊत म्हणाले, कारागृहात असलेल्यांकडून पत्र लिहून घेऊन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. जेलमध्ये असलेल्यांकडून चिट्टी लिहून घेतली जाते, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. सचिन वाझे याच्‍या पत्राबाबत सत्यता कोणी सांगु शकत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतले जाऊ शकते. या प्रकारचे घाणेरडे राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही, असेही त्‍यांनी सांगितले. 

पत्रामध्‍ये अनिल परब,अजित पवार, अनिल देशमुख यांच्‍या नावाचा उल्‍लेख आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतले जाते. तो पुरावा म्हणून समोर आणले जाते. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामात त्‍यांचा कधीच सहभाग असत नाही. अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. खरा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊन काही करणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचा राजकीय स्‍वार्थासाठी वापर होत आहे. अशा प्रकारे कोंडीत पकडून महाराष्ट्राच्या सरकारला अस्थिर करण्याचे डावपेच करत असतील तर यशस्वी होणार नाहीत, विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.  वाझे याच्‍या  पत्राची सत्यता कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्मे आहेत, याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

लसीकरणाच्या मुद्यावरदेखील राऊत म्‍हणाले, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलेले आरोप खोटे आहेत. महाराष्ट्रावर दबाव आणण्यासाठी संकटात आणण्यासाठी हे असे आरोप करत आहेत. लसीकरणाबाबत महाराष्ट्र सरकार काय करत आहे, याचा सर्व आढवा केंद्राला दिला आहे. तरीही महाराष्ट्राची बदनामी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्यादिवसापासून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्‍यांनी यावेळी केला.