Sat, Apr 10, 2021 19:24
महाविकास आघाडी म्हणजे महावसूली आघाडी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा घणाघात

Last Updated: Apr 09 2021 3:02AM

नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा 

पोलिसांच्या माध्यमातून पैसे वसूल करणे हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम बनला असल्याची जोरदार टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जाावडेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली. महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी नसून ती महावसूली आघाडी असल्याचा टोमणाही जावडेकर यांनी यावेळी मारला. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या घटना व्यथित करणार्‍या असल्याचे सांगून जावडेकर पुढे म्हणाले की, पोलिस बॉम्ब ठेवतात आणि गृहमंत्री वसुली करतात, असे दृष्य देशात यापूर्वी कधी पहावयास मिळाले नाही. पण दुर्दैवाने मुंबईत असे दृष्य पहायला मिळाले. पोलिसांच्या माध्यमातून पैसे वसूल करण्याचा उद्योग आघाडी सरकारने चालविलेला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग व वादग्रस्त निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी पत्रात केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. शिवसेनेची यावरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. राज्यात लुटीशिवाय दुसरे काहीही सुरु नाही. तुम्ही जर वसुली करण्यासाठी सरकार बनविलेले असेल तर लोक तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. आघाडीचे सरकार निवडणुका जिंकून आलेले नाही, हे सत्य आहे. निवडणुका सुरु असताना भाजप आणि शिवसेना एकत्र होते. प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचा वापर करुन शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचार केला व ते निवडून आले. नंतर शिवसेनेने भाजपचा विश्‍वासघात केला. अशा प्रकारचा घातकीपणा महाराष्ट्राने यापूर्वी पाहिला नव्हता. आघाडीतल्या लोकांकडून आणखी काही दाखवायचे राहिलेले नाही. त्यामुळे या सरकारने तात्काळ सत्‍तेतून पायउतार झाले पाहिजे. 

महाराष्ट्राच्या अब्रुची लक्‍तरे निघाली......

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण गाजत असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाझे म्हणजे काय लादेन आहे काय? असा प्रतिप्रश्‍न केला होता. तर खा. संजय राऊत यांनी वाझे हे हुशार पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले होते. ठाकरे व राऊत यांच्या संभाषणाची क्‍लिप यांनी जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेने सचिन वाझेचा बचाव केल्याचा आरोप जावडेकर यांनी केला. पैसे गोळा करा, लुटा आणि वसुली करा...हा एकमेव कार्यक्रम या सरकारने राबविलेला आहे. महाराष्ट्राच्या अब्रुची लक्‍तरे निघाली आहेत, असेही ते म्हणाले. गेल्या महिनाभरापासून राज्यात अशा उलथापालथी होत आहेत. रोज इतके नवनवीन खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणेही कठीण झाले आहे, असे सांगून जावडेकर पुढे म्हणाले की, पोलिसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते, त्याची हत्या होते. हत्या कोणत्या हेतुने झाली हे लवकरच समोर येईल. आता तर हत्येचा आरोप असलेल्या सचिन वाझेचे पत्र समोर आले आहे. तत्कालीन गृहमंत्र्यांनी वाझेला पैसे वसूल करायला सांगितले. पुन्हा सेवेत आल्यानंतर काढले जाऊ नये, म्हणून दोन कोटी मागितले. अनिल परब यांनीदेखील भेंडी बाजार पुनर्वसन योजनेतून 50 कोटी रुपयांच्या वसुलीची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटींची मागणी परब यांनी केली. ही संपूर्ण लूट सुरू होती. पण जसे अनिल परब यांच्यावर आरोप झाले, तशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली. उद्धव ठाकरे शांत झाले.