Fri, Jul 03, 2020 01:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #Lockdown5 : धार्मिक स्थळे, हॉटेल्स, मॉल्स ८ जून नंतर होणार खुली 

#Lockdown5 : धार्मिक स्थळे, हॉटेल्स, मॉल्स ८ जून नंतर होणार खुली 

Last Updated: May 30 2020 8:27PM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने आज, शनिवारी कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० जून पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली. कंटेनमेंट झोन बाहेरील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु होतील, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

वाचा : केंद्र सरकारकडून लॉकडाऊन ५ ची घोषणा

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अन्य आदिरातिथ्य सेवा, शॉपिंग मॉल्स ८ जून नंतर खुले केले जातील. तर शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था राज्यांशी सल्लामसलत केल्यानंतर खुल्या केल्या जाणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक, मेट्रो सेवा, सिनेमा हॉल्स, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन स्थळे परिस्थितीनुसार खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीमध्ये म्हटले आहे.

आंतरराज्य आणि राज्यांतर्गंत मालवाहतुकीला निर्बंध नाहीत. त्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नाही. अत्यावश्यक सेवा वगळून रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान संचारबंदी राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असे नमूद केले आहे.   

वाचा : लॉकडाऊन ५.० मध्ये शाळा, महाविद्यालये उघडायची की नाहीत; केंद्राने घेतला 'हा' निर्णय!

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत नियम शिथिल करुन पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योग खुले करण्याची मागणी राज्यांनी केंद्र सरकारने केली होती. राज्यांच्या मागण्यांचा विचार करुन केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.