Wed, Jan 20, 2021 00:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सप्टेबरपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल : डॉ. तात्याराव लहाने (video)

सप्टेबरपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल : डॉ. तात्याराव लहाने (video)

Last Updated: Jul 03 2020 2:52PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे अडीच लाख रुग्ण असतील. जूनपर्यंत राज्यातील रुग्णसंख्या 5 लाखांपर्यंत जाईल, असे भीती घालणारे अंदाज काहींनी वर्तविले; पण तसे काहीही घडले नाही. कारण, कोरोनाविरुद्ध महाराष्ट्र अत्यंत कणखरपणे लढला... लढतो आहे. त्याचे फलित म्हणून येत्या 15 जुलैपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली यायला सुरुवात होणार आहे आणि आजपासून 90 दिवसांनंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा जोर कमी व्हायला लागेल. सारे काही सुरळीत होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल, असे माझे मत आहे... आणि कुणाचे तरी, काही तरी ऐकून हे मत तयार झालेले नाही. पहिल्या दिवसापासून ते या क्षणापर्यंत कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील एक सैनिक म्हणून प्रत्यक्ष परिस्थितीच्या अनुभवाअंती व अवलोकनाअंती ते मी व्यक्‍त करतो आहे, अशी दुर्दम्य आशेची पालवी वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेचे (महाराष्ट्र राज्य) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘पुढारी वेबिनार’मध्ये आज फुलवली! 

‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी डॉ. लहाने यांचे स्वागत केले. ‘कोरोनाविरुद्ध महाराष्ट्राने पुकारलेल्या लढ्यातील बिनीचे शिलेदार’ असा मोजक्या शब्दांत डॉ. लहाने यांचा नेमका परिचय करून देत डॉ. जाधव यांनी बुधवारच्या ‘पुढारी वेबिनार’ची उद्दिष्टे विशद केली. ते म्हणाले, कोरोनाकाळ हा समाजामध्ये एकुणात नैराश्य रुजविणारा ठरलेला आहे. कधी एकदा यातून बाहेर पडतो, असे सगळ्यांना झालेले आहे. हे नैराश्य आपल्याला आणखी किती दिवस पुरेल, या संपूर्ण महाराष्ट्राला सतावणार्‍या प्रश्‍नाच्या उत्तराचा वेध घेणे या पार्श्‍वभूमीवर क्रमप्राप्‍त आहे.

डॉ. जाधव यांच्या या आवाहनवजा प्रास्ताविकाचा धागा धरून डॉ. लहाने म्हणाले, नैराश्याचे मळभ आता हटत आहेत. सध्या जी औषधे रुग्णांवर वापरली जात आहेत, ती परिणामकारक ठरत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर उत्तम आहे. राहिला दिवसेंदिवस नव्याने समोर येणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रश्‍न, तर त्याचे उत्तरही आता फार लांब राहिलेले नाही. मुंबई महानगर प्रदेशाचेच उदाहरण घ्या. येथे सुरुवातीच्या काळात दोन-तीन दिवसांनीच रुग्ण दुप्पट होत होते. मुंबईतील डबलिंग रेट (रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर) आता 21 दिवसांवर गेला आहे. डबलिंग रेट जेव्हा 30 दिवसांवर जाईल, तेव्हा बरे होणारे रुग्ण आणि नव्याने दाखल होणारे रुग्ण यांच्यात आपोआपच समतोल साधला जाईल. शिवाय, कोरोनावर उपचारासाठी आपल्याकडे हायड्रॉक्सिक्‍विनोलीनच्या सोबतीला डेक्सामिथॅसोन, टॉसिलझ्युमॅब, फॅव्हिपिराव्हीर, रेमेडीसिव्हीर यासारखी प्रभावी औषधेही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मुंबईत रुग्णांसाठी बेड नाही, असे चित्र आता नाही.

मुंबईत 450 रुग्णवाहिका 24 तास सेवेत आहेत. 120 व्हेंटिलेटर सज्ज आहेत. राज्यभरात आयसोलेशन वॉर्डांतून 1 लाख 64 हजार बेडस् आहेत. रुग्णालयांतून 1 लाख 35 हजार बेडस् आहेत. अतिदक्षता विभागांतून 10 हजार बेडस् आहेत. गेल्या 10 दिवसांतच मुंबई रुळावर यायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी दिवसागणीक डबलिंग रेटचे दिवस वाढत चाललेले आहेत. हे कसले द्योतक आहे, तर कोरोना आटोक्यात येत असल्याचेच हे संकेत आहेत. कोरोनाविरुद्ध संघर्षात महाराष्ट्र विजयाच्या नजीक असताना लोकसहभागाची आवश्यकता मात्र अधिक प्रासंगिक झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात निर्बंध होते. निर्बंध सैल होत असताना आता लोकांवर जबाबदारी आलेली आहे. सरकार किंवा यंत्रणा केवळ स्वत:च्या बळावर हे युद्ध जिंकू शकत नाही. लोकांनी घराबाहेर उगीच पडू नये आणि पडण्याची वेळ आली, तर मास्क घालावा. इतरांपासून शारीरिक अंतर राखावे. खुलेआम खोकू, शिंकू नये. बाहेरून घरी परतल्यानंतर 30 सेकंदांपर्यंत साबण सर्वांगावर उगळवत राहावा आणि साधी कणकण वाटली तरी ती अंगावर काढू नये. लगेच डॉक्टरांना दाखवावे. हृदयविकार, मधुमेह, रक्‍तदाब हे सगळे नियंत्रित असेल, तर अशा रुग्णांनाही कोरोनावर मात करता येते. सामान्य कोरोना रुग्णांना तर मग हे सहज शक्य आहे. विषय आहे तो रुग्णाने वेळेत उपचारासाठी दाखल होण्याचा. तसे घडले, तर मोजून 3 दिवसांत त्याला कोरोनामुक्‍त करण्याची ताकद महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेत आहेे, असा दावा डॉ. लहाने यांनी केला.

महाराष्ट्रात काही ठिकाणी मृत्यू दर अधिक आहे, तर काही ठिकाणी कमी आहे. त्यामागे त्या-त्या भागातील कोरोना विषाणूचे स्वरूप कारणीभूत आहे की, त्या-त्या भागातील लोकांची रोगप्रतिबंधक क्षमता कमी-अधिक असणे कारणीभूत आहे, यावर संशोधन सुरू असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.

कोरोनामुळे अनेक शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत, त्याचे काय, असा प्रश्‍न पुढ्यात आल्यानंतर डॉ. लहाने यांनी सांगितले की, येत्या 10 ते 15 दिवसांत त्या पूर्ववत सुरू केल्या जातील. सध्या त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. अर्थात, टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया सुरू होतील. एकदम मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार नाहीत.

गरोदर महिलांसाठी चाचणीची स्वतंत्र व्यवस्था मुंबईसह राज्यात सर्वत्र करण्यात आलेली आहे. वैद्यकीय शिक्षणांतर्गत पदवी अभ्यासक्रमाचे (अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद) वेळापत्रक आजच जाहीर करण्यात आले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रकही ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊन नसते, तर महाराष्ट्रात या क्षणाला कोटीवर रुग्णसंख्या गेली असती, असेही ते म्हणाले. संतोष आंधळे यांनी सूत्रसंचालन व निवेदन केले.

राज्यात समूह संसर्ग नाही

डॉ. लहाने यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कम्युनिटी ट्रान्समिशन (समूह संसर्ग) कुठेही नाही. लोकल ट्रान्समिशन (स्थानिक संसर्ग) असेच राज्यातील संक्रमणाचे स्वरूप आहे. एकाच उदाहरणावरून हे लक्षात येईल. कोरोना युद्धात थेट सहभागी असलेल्या 800 जणांच्या अँडिबॉडी टेस्ट मुंबईतील जे. जे. रुग्णालयात घेण्यात आल्या. त्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. सर्व्हेलन्समध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. रुग्ण आढळला की, त्याच्या संपर्कात आलेल्यांचा मागोवा घेण्यात आणि त्या सर्वांना क्‍वारंटाईन करण्यात आपण कसूर केल्याचे एकही उदाहरण नाही.

रक्‍तदान श्रेष्ठ दान; पण प्लाझ्मा दान हे जीवनदान

कोरोना रुग्णांना राज्यभरात 23 ठिकाणी प्लाझ्मा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा पाडाव करण्याच्या द‍ृष्टीने कोरोनामुक्‍त रुग्णाच्या पेशी या प्रशिक्षित असतात. कोरोनामुक्‍त रुग्णाच्या प्लाझ्मादानाने कोरोना रुग्णाचा जीव वाचविला जाऊ शकतो. म्हणून दुरुस्त झालेल्या कोरोना रुग्णाने प्लाझ्मा दान करायलाच हवे. याहून मोठे पुण्यकर्म प्राप्‍त परिस्थितीत दुसरे नाही, अशी साद ‘पुढारी वेबिनार’मधून डॉ. लहाने यांनी घातली.