Tue, Aug 04, 2020 23:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'सीएए विरोधातील आंदोलक देशद्रोही नाहीत'

'सीएए विरोधातील आंदोलक देशद्रोही नाहीत'

Last Updated: Feb 16 2020 1:49AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. सीएए विरोधात जे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. त्यांना ते आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्यांना देशद्रोही, गद्दार अशी लेबलं लावता येणार नसल्याचे खंडपीठाने ठणकावून सांगितले आहे. 

माजलगावमध्ये सीएए विरोधात आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर काही नागरिकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणी करताना शांततापूर्ण आंदोलन करण्यास संमती असून अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही अथवा गद्दार म्हणता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.

या आंदोलनामुळे सीएए कायद्याच्या तरतुदींची अवहेलना होण्याचा प्रश्न उपस्थित होत नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तसेच, आंदोलक केवळ एका कायद्याला विरोध करत असल्याने त्यांना देशद्रोही, गद्दार म्हटले जाऊ शकत नाही. ते केवळ सरकारविरोधातील आंदोलन आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. 

खंडपीठाने सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या अहिंसक आंदोलनांची आठवण करुन दिली. 'अहिंसक आंदोलनांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाचे नागरिक आजही अहिंसेच्या मार्गाने जात आहेत. देशवासी अजूनही अहिंसेवर विश्वास ठेवतात, हे भाग्याचं लक्षण आहे, अशा शब्दांत खंडपीठाने अहिंसेच्या मार्गाने होत असलेल्या आंदोलनांचं कौतुक केले.