Wed, May 12, 2021 02:00
महाराष्ट्रासह चार राज्यांत कोरोना रुग्णसंख्या घटली

Last Updated: May 03 2021 11:40PM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रासह चार राज्यांत सोमवारी नव्या रुग्णसंख्येत अचानक घट झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली ही ती राज्ये असून, छत्तीसगडमध्येही घट नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात दररोज 60 हजारांपेक्षा अधिक असलेली बाधितांची संख्या आता 50 हजारांच्या आत आली आहे.

विशेषत:, महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव, भंडारा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांतून कोरोना कमी होण्याची लक्षणे सोमवारी दिसली. मात्र, रुग्णसंख्येतील ही घट अगदीच प्राथमिक लक्षणासारखी असून, इतक्यात त्यावरून काही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

रविवारी देशभरात कोरोना चाचण्या तुलनेने कमी करण्यात आल्या. त्याचाही परिणाम सोमवारी रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात झालेला दिसतो. रविवारी देशभर 15 लाख चाचण्या झाल्या. त्या तुलनेत अन्य दिवशी 18 ते 19 लाख चाचण्या केल्या जातात. शनिवारी 18 लाख चाचण्या झाल्या होत्या. त्याअगोदर ही संख्या 19 लाखांच्याही पुढे गेलेली दिसते. चाचणीचा अहवाल साधारणत: दुसर्‍या दिवशी येतो. ओघानेच चाचणीच्या दुसर्‍या दिवशी आलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्या कमी-जास्त होते. रविवारी चाचण्यांची संख्या घटल्याने सोमवारी रुग्णसंख्या घटली, असा निष्कर्ष काढला जात आहे.