मुंबई : पुढारी वृत्तसेवा
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने शिवभोजन थाळीची संख्या 18 हजारांवरून 36 हजार इतकी करण्यात आली आहे. प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी किमान 75 व कमाल 150 थाळींचे उद्दिष्ट आता 200 थाळी इतके केले जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे.
या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आता थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये बस आणि रेल्वे स्थानके, बाजारपेठा यांसारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबविली जात असली तरी भविष्यात योजनेचा आणखी विस्तार होणार आहे.
यासाठी दानशूर दाता, प्रायोजक, कंपन्यांचा सीएसआर फंड आणि टाटा ट्रस्ट, इस्कॉनसारख्या अनेक स्वयंसेवी संस्थांना सहभागी केले जाणार आहे. शिवभोजन केंद्रांना भेट : अन्न, नागरी पुरवठा विभागातील अधिकार्यांव्यतिरिक्त तहसीलदार, गट विकास अधिकारी तथा समकक्ष अधिकार्यांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट व तपासणी आयोजित करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यावयाचे आहे.
दात्यांकडून मदत स्वीकारणार
शिवभोजन योजना ही मुळात गरीब व गरजू लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांना, दात्यांना शिवभोजन योजनेसाठी मदत करण्याची इच्छा आहे. स्पॉन्सरशिप देण्याबाबतही सरकारला विचारणा होते आहे. काही कंपन्यांनी सामाजिक दायित्व (सीएसआर फंड) निधीची रक्कम शिवभोजन थाळीसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी ‘फूड ऑन व्हील’ची चाचपणी सुरू आहे. मोठ्या शहरांत जागा कमी असल्याने असे फूड ट्रक/बस उपयुक्त ठरतील. असे ट्रक/बस बनवता येतील काय, याच्या सूचना बेस्ट व एसटी महामंडळाला देण्यात आल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.