होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी

महाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले

Last Updated: May 29 2020 7:03PM
बदलापूर : पंकज साताळकर 

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. २६ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आल्याने महाराष्ट्रातील अनेक मराठी कुटुंबीय विद्यार्थी आणि युएईत अडकले आहे. यातील बाराशे व्यक्तींना भारतात परत यायचं आहे. त्यातील साडे आठशे व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आल्या. त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवले आहेत. त्याच्यात "मुंबई रिपार्टिसिपेशन" च्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री कार्यालयापासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत अनेकांना विनंती अर्ज आणि ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप, ई मेल आणि फोनच्या माध्यमातून संपर्क करून मुंबई किंवा महाराष्ट्रात येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करत आहेत. मात्र त्यांना सहानुभूती दाखवण्यापलीकडे अद्याप हाती काहीच न लागल्याने यूएत राहणारे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबीय आणि त्यांचे महाराष्ट्रातील नातेवाईक हे चिंतातूर झाले आहेत.

वाचा : केडीएमसी मुख्यालयाला कोरोनाची लागण

दुबईत राहणाऱ्या अनेक कुटुंबातील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. यात ३५ महिला या तीसहून अधिक आठवड्यांच्या गरोदर महिला असून त्यांना पुढील काळात भारतात येऊन प्रसूती करायची आहे. दुबई येथील भारत सरकारच्या विदेश मंत्रालयातून संपर्क साधून व विनंती करून देखील महाराष्ट्रासाठी अद्याप विमानसेवा सुरू झाल्याची कोणतेही ही माहिती पुढे येत नसल्याने या ३५ महिलांसह काही नोकरी गेलेले तरुण- तरुणी व नागरिक देखील हवालदिल झाले आहेत. तसेच काहींना भारतात येऊन पुढील काळात ऑपरेशन देखील करायचे आहेत. 

या सगळ्या नागरिकांना एकत्र करण्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून दुबईकर दादुस या फेसबुक ब्लॉग चालवणाऱ्या शुभांगी साका यांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या सातत्याने विनंती करत आहोत मात्र अद्यापपर्यंत आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र येण्याची कोणतीही परवानगी मिळालेली नाही. ती आम्हाला लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या सगळ्या मराठी माणसांना एकत्र करणाऱ्या धनश्री पाटील यांनी सांगितले की, मुंबईमध्ये इतर देशातून येणाऱ्या विमानांना मुंबईत उतरण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र युएईमधून येणाऱ्या नागरिकांना अद्याप ही परवानगी का देण्यात आले नाही. याबाबत कोणीही स्पष्ट माहिती देत नसल्याने अनेकांच्या मनात घालमेल सुरू झाली आहे. 

मुंबईत उतरवणे सगळ्यांनाच शक्य नसल्यास नाशिक, नागपूर, पुणे किंवा राज्यात इतर कुठेही उतरण्याची परवानगी दिल्यास नागरिकांना आपल्या घरी जाता येईल किंवा क्वारंटाईन सेंटर ठेवता येईल. मात्र भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करून अडकलेल्या नागरिकांना परत घेऊन येण्याची विनंती धनश्री पाटील यांनी केली आहे.

दुबईत राहणाऱ्या तेजश्री सावंत या ३५ आठवड्याच्या गरोदर महिलेला त्यांच्या पतीसह केरळ येथे उतरण्याची परवानगी मिळवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावे लागले. तीन आठवड्यानंतर ही परवानगी मिळाली. मात्र केरळवरून पुन्हा महाराष्ट्रात जाताना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्रातच उतरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती पाटील यांनी केली आहे. तर नोकरी गेल्यामुळे यूएई मध्ये राहात असलेल्या अमेय शिर्के यांच्यासमोर तर आणखी मोठी आव्हाने आहेत. कारण येथे राहण्याचे भाडे आणि खाण्याचा खर्च मोठा असल्याने व व्हिसाचा कलावधी देखील संपणार असल्याने यापुढील काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन युएईमध्ये अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर मायभुमीत आणावे, अशी विनंती शिर्के यांनी केली आहे. 

वाचा :महाराष्ट्रात सरकारची सुरु आहे 'बनवाबनवी'; आशिष शेलारांचा घणाघात