Tue, Sep 22, 2020 07:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्मचार्‍यांसाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत पवार-ठाकरेंचे एकमत

कर्मचार्‍यांसाठी मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत पवार-ठाकरेंचे एकमत

Last Updated: May 23 2020 7:09PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मुंबईतील लाईफलाईन असलेली लोकल रेल्वे सेवा सुरू करावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना करण्यात येणार आहे. त्याबाबत शनिवारी आघाडीच्या बैठकीत एकमत झाले. राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली.

बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता उपस्थित होते. यावेळी पवार आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार आता मुख्यमंत्री आणि पवार केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत.

याशिवाय, बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचे यासंदर्भातही चर्चा झाली. लॉकडाऊन कसा शिथिल करता येईल, यावर बैठकीमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. येत्या 31 तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून नव्या सूचना जारी कराव्या लागणार आहेत. त्याबाबत यावेळी चर्चा झाली.

मंत्रालय आणि महापालिकेच्या कर्मचार्‍यांची हजेरी वाढवण्याच्या आणि त्यांना कामावर उपस्थित राहण्याच्या सक्त सुचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना कर्तव्यवर हजर होण्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे तो प्रवासासाठी वाहनसेवेचा. शिवाय आरोग्यसेवेतील कर्मचार्‍यांच्या कामावर हजर होण्यासाठी प्रवासाचा प्रश्‍न निर्माण होवू लागला आहे. तसेच पुढील व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रवासाचे महत्वाचे साधन हे उपनगरीय रेल्वेसेवाच आहे, म्हणून ती चालू करण्याबाबतचा आग्रह रेल्वेमंत्र्यांकडे धरला जाणार आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खरीप हंगामापूर्वीच्या नियोजनाची आढावा बैठक नुकतीच घेतली होती. लॉकडाऊन दरम्यान अनेक समस्यांवर निर्माण झाल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. उपाययोजना आखण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला शेतकरी, शेतमजूर, छोटे उद्योजक आणि केंद्राच्या पॅकेजमधून सुटलेले राज्यातील जे घटक आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारला लॉकडाऊन उठवताना काहीतरी आधार द्यावा लागणार आहे. त्यात कोणकोणत्या बाबींचा समावेश करायचा, आर्थिक तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालातील सुचनांची अंमलबजावणी कशाप्रकारे प्रभावीपणे करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली.

यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने 1 जुनपासून प्रत्येक दिवशी 200 लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकीट आरक्षणालाही शुक्रवारपासून सुरुवात झाली. या सर्व गाड्या बिगरवातानुकूलित (नॉन एसी) असतील. तर सध्या राजधानी मार्गावर फक्त वातानुकूलित एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत. मात्र लोकल चालू केल्या तर त्यात सोशल डिस्टन्सींगचा प्रश्‍न कसा मेन्टेन करावा लागणार याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

 "