Thu, Sep 24, 2020 10:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कशाच्या आधारे ‘टुकडे टुकडे गँग’ला दोषी ठरवत आहात?; राष्ट्रवादीचा सवाल

कशाच्या आधारे ‘टुकडे टुकडे गँग’ला दोषी ठरवत आहात?; राष्ट्रवादीचा सवाल

Last Updated: Jan 21 2020 2:32PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

जो सरकारच्या विरोधात भूमिका मांडेल त्याला थेट देशविरोधी म्हणण्याची पद्धत सुद्धा रुढ झाली आहे. जेएनयूमधील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना थेट सरकारकडून तुकडे तुकडे गँगची उपमा दिली जाते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आघाडीवर आहेत. असे असले तरी काल केंद्रीय गृह मंत्रालयाने आम्हाला तुकडे तुकडे गँगची कोणतीच माहिती नसल्याचे उत्तर दिले. केंद्रीय गृह मंत्रालायाच्या या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेवर राष्ट्रवादीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

आरटीआय कायकर्ते साकेत गोखले यांनी तुकडे तुकडे गँगची माहिती घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने माहिती दिली आहे. यामध्ये मंत्रालयाने स्पष्टपणे आम्हाला तुकडे तुकडे गँगची कोणतीच माहिती नसल्याचे उत्तर दिले. 

केंद्रीय गृह मंत्रालायाच्या या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेवर राष्ट्रवादीने ट्विट करत अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशातील अशांततेला ‘टुकडे टुकडे गँग’ जबाबदार आहे, असा आरोप अमित शहा यांनी केला होता. पण अशी कोणतीही गॅंग अस्तित्वात नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयानेच माजी पत्रकार साकेत गोखले यांनी माहिती अधिकारखाली विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे. असे सांगत मग कोणत्या पुराव्याच्या आधारे शहा या गॅंगला देशातील अशांततेसाठी दोषी ठरवत आहेत? असा सवाल करत राष्ट्रवादीने शहा यांचा समाचार घेतला आहे. 

तसेच, देशातील जनतेशी खोटं बोलल्याबद्दल आणि त्यांची दिशाभूल केल्याबद्दल आता शहा माफी मागणार का? हे त्यांनी स्पष्ट करावे. अशी मागणीदेखील राष्ट्रवादीने ट्विटद्वारे केली आहे.

 

 "