नवी मुंबई : पुढारी वार्ताहर
वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेतील 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. गणेश नाईक यांना भाजपमध्ये घेण्यासाठी अनेक दिवसांपासून डोळा ठेवून होतो, मात्र काही गोष्टींचा योग यावा लागतो तो आज आला. आता नवी मुंबईचे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे संचालक प्रशांत ठाकूर, खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी महापौर सागर नाईक, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गणेश नाईक आणि संजीव नाईक यांच्यासह 48 नगरसेवकांचे भाजपमध्ये स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, राज्याप्रमाणे नवी मुंबईतही अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मागील सरकारच्या कारकिर्दीत सुटले नाहीत. परंतु भाजपच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत असून, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त गावठाणातील घरांचा प्रश्न व औद्योगिकीकरण असे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी गणेश नाईक भाजपमध्ये आल्यामुळे आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका या आता भाजपला जोडल्या गेल्याने या परिसरातील भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न नगरविकास खात्यामार्फत मार्गी लागतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
एमएमआरडीएच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेल, पालघर, ठाणे यांचे मेट्रोच्या माध्यमातून एका तासात जोडले जाण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. सत्तर वर्षानंतर सर्वसामन्यांना घर, गॅस, शौचालय, वीज आदी मूलभूत सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. देश प्रगतीकडे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात प्रत्येकालाच भाजपचा आपणही हिस्सा व्हावे असे वाटते. त्यामुळेच भाजपचा विस्तार होत आहे. विरोधकांकडून भाजपमध्ये मेगाभरती होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र विरोधी पक्षांमध्ये मेगागळती का होत आहे याचे आत्मचिंतन त्यांनी करण्याची वेळ आली आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना मारला. भाजपा सरकारच्या काळात मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपा सरकारने मार्गी लावला आहे. तर राज्याचा विकासदेखील फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. येणार्या पाच वषार्ंतदेखील पुन्हा फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे परिवर्तन सुरु राहील, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी जगात भारताची प्रतिमा उज्वल केली आणि आर्थिक मंदीतही शिक्षण, औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राने प्रगती केली, अशा शब्दांत गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.