Wed, Aug 12, 2020 09:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गच्चीवरील पबला आग;11 महिलांसह 14 ठार!

गच्चीवरील पबला आग;11 महिलांसह 14 ठार!

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:46AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

गुरुवारी मध्यरात्री मुंबईतील कमला मिल कम्पाऊंडने भीषण अग्नितांडव अनुभवले. या कम्पाऊंडमधील वन अबाव्ह या रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला तर 41 जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. आगीमुळे घाबरलेल्या काही लोकांनी बाथरूममध्ये कोंडून घेतल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून मुंबई महापालिकेच्या पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

गुरुवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास वन अबाव्ह रेस्टॉरंट आणि पबला ही आग लागली. आग लागली तेव्हा वन अबाव्ह रेस्टॉरंट आणि पबमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग बाजूलाच असलेल्या मोजोस बिस्त्रो या पबमध्येही पसरली. कोणाला कळण्याच्या अगोदरच आग पबच्या आत पसरली आणि सर्वत्र पळापळ झाली. प्रत्येक जण जीवाच्या आकांताने पळत होता. दुर्दैवाने आगीच्या धुराने दोन्ही पबमध्ये असलेल्यांना आपल्या विळख्यात घेतले. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, आगीचे स्पष्ट कारण अद्यापही कळू शकलेले नाही; पण आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमांनंतर ही आग विझवण्यात यश आले.

आगीतील जखमींना जवळच्याच केईएम रुग्णालयामध्ये नेण्यात आले. एकूण 55 जणांना या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यापैकी 14 जणांचा आगीत होरपळून तसेच गुदमरून मृत्यू झाला होता. काहींना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. तर काही जणांना अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले. नवी मुंबईच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये एकाला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातावर आणि पायावर भाजल्याच्या जखमा आहेत. पण त्याची प्रकृती फार गंभीर नाही. आम्ही त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करत आहोत, असे तेथील डॉक्टर सुनील केसवानी यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाचे डॉ. राजेश ढेरे आणि त्यांच्या टीमने मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले. या सर्व लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. आग लागल्यानंतर आगीपासून स्वतःला वाचवण्यासाठी या सर्वांनी बहुधा आपल्याला कोंडून घेतले असावे. यामुळे नाका, तोंडात धूर जाऊन या सर्वांचा मृत्यू झाला, असे डॉ. ढेरे यांनी सांगितले. केईएम रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. हरिश पाठक यांच्या सांगण्यानुसारही या दुर्घटनेतील व्यक्तींचा मृत्यू हा भाजल्यामुळे न होता गुदमरल्यामुळे झाला आहे. 
मृतांची नावे  : प्रीती रोजानी (49 वर्षे) तेजल गांधी (36 वर्षे) प्राची खेतानी (31) प्रमिला केणी (28) किंजल शहा (28) कविता गोर्‍हाणी (36) पारुल (45) मनीषा शहा (30) यशा ठक्कर (28) शेफाली दोशी (45) खुशबू (28) सरबजित परेरा (24) विरवा ललानी(23) धैर्या लखानी (26).

आत्यासह दोघे भाऊही मृत्युमुखी 
या भीषण अग्‍नितांडवात धैर्य आणि विश्‍वा ललानी हे दोन सख्खे भाऊ आपल्या आत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडले. 
ते अमेरिकेतून सुट्टीत भारतात आले होते. धैर्य(26) आणि विश्‍वा (23) यांचे मृतदेह वॉशरूमशेजारी सापडले.त्यांची आत्या प्रमिलाने या दोघांसह त्यांच्या मित्रांसाठी पार्टीचे आयोजन ‘वन अबाव्ह’मध्ये केले होते; पण दुर्दैवाने हे तिघेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. प्रमिला या कधीही पार्टीसाठी जात नसत. मात्र, हे दोघे अमेरिकेहून आल्याने त्यांनी यावेळी जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती एका नातलगाने दिली.

जन्मदिनीच मृत्यूने तिला गाठले !
खुशबू मेहता (28) ही तरुणी वन अबाव्ह रेस्टॉरंटमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी गेली होती. 28 डिसेंबर खुशबूचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी खुशबू त्याठिकाणी गेली होती. पण, जन्मदिनीच खुशबूवर काळाने झडप घातली. अग्नितांडवात गुदमरल्याने खुशबूचा मृत्यू झाला. केईएम रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना खुशबूचे आजोबा बाबूलाल मेहता म्हणाले, तिचे लग्न झाले होते. खुशबूचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी ती रेस्टॉरंटमध्ये गेली होती. हॉटेल प्रशासन जबाबदारीने काम करत नाही. टेरेसवर बांबूचे बांधकाम करण्यात आले होते. याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती किंवा आग विझवण्यासाठी काही सामग्री नव्हती. या गोष्टीकडे पोलीस आणि पालिका प्रशासन लक्ष देत नाही, अशी तीव्र नाराजी बाबूलाल मेहता यांनी व्यक्त केली.