होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी?

पबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी?

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:37AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

कमला मिलमधील वन अबाव्ह पबसह अन्य पब व हॉटेलला बड्या राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे समजते. विशेष म्हणजे वन अबाव्ह पबमध्ये शिवसेनेसह भाजपाचे वरिष्ठ नेतेच नाही, तर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भागीदारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पबवर कारवाई होणे अशक्य असल्याचे पालिकेच्या काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. 

कमला मिलसह अप्पर लोअर परेल भागातील रघुवंशी मिल व अन्य मिल कम्पाऊंडमधील पब व हॉटेलमध्ये अनेक राजकीय नेत्यांची भागीदारी असल्याचे बोलले जात आहे. वन अबाव्ह मध्ये शिवसेना व भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मुलाची व एका प्रसिद्ध गायकाच्या मुलाची भागीदारी असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. याला पालिकेच्या काही अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. वन अबाव्ह या पबमध्ये शिवसेना व भाजपाचे मुंबईतील दोन नेते आठवड्यातून किमान दोन वेळा येतात, एवढेच नाही तर मध्यरात्री उशिरापर्यंत हे नेते पबमध्ये असतात, याला भाजपा व शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे. 

विशेष म्हणजे येथील पब व हॉटेलचा हप्ता राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्‍यासह पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना दर महिना सुमारे 2 ते 3 लाख रुपयांचा हप्ता जात असल्याचे समजते. अनेकदा पबमध्ये या नेत्यांच्या ओळखीने प्रवेश दिला जातो. राजकीय वरदहस्त असलेल्या या पबला आग लागल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन, आम्ही पबमधील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. पण प्रत्यक्षात या पबमध्ये भागीदारी असलेल्या बड्या नेत्यांसह अधिकार्‍यांवर कारवाई होणार का ? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.