Thu, Sep 24, 2020 16:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेरीवाला मुद्द्यावर मनसे अवमान याचिकेच्या तयारीत

मनसे दाखल करणार अवमान याचिका!

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 2:32AM

बुकमार्क करा

मुंबई :  प्रतिनिधी 

रेल्वे स्थानक  परिसरात व महापालिका मंडईच्या 150 मीटर अंतरापर्यंत तसेच  शाळा, रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या 100 मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना धंदा करण्यास प्रतिबंध करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी अन्यथा न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. यासंदर्भात महापालिका अधिकारी, पोलीस स्थानके व रेल्वे प्रशासनाला  मनसेच्या पदाधिकार्‍यांनी राज ठाकरे यांचे पत्र दिले व फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सहाय्य करू नये अशी मागणी केली. 

मनसेच्या मुंबईतील पदाधिकार्‍यांनी आपापल्या विभागात निवेदने देऊन या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मनसेचे माहीम, दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शिष्टमंडळासह माहीम, दादर व शिवाजी पार्क पोलीस स्थानक, जी नॉर्थ पालिका कार्यालय, माहीम, दादर व माटुंगा रेल्वे स्थानक यांना निवेदन दिले.

फेरीवाल्यांच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत व राज ठाकरेंचे पत्र घेऊन मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे, अंधेरी विभाग अध्यक्ष मनीष धुरी, वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई व कार्यकर्त्यांनी पालिका अधिकारी, ओशिवरा व आंबोली पोलीस स्थानक व जोगेश्‍वरी येथील रेल्वे स्टेशनप्रमुखांची भेट घेऊन त्यांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निवेदन दिले.