Tue, Jun 15, 2021 12:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कशेडी घाटात दरड कोसळली; तब्बल १२ तास मुंबई-गोवा महामार्ग बंद

कशेडी घाटात दरड कोसळली; तब्बल १२ तास मुंबई-गोवा महामार्ग बंद

Last Updated: Jul 10 2020 10:05AM

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात धामणदेवी येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.पोलादपूर (रायगड) : पुढारी वृत्तसेवा

गेले दोन दिवस धुवांधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात धामणदेवी येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.

वाचा : एका दिवसात २६ हजारांवर रुग्ण; ४७५ जणांचा बळी

डोंगराचा भाग खचून भलामोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडल्याने आपत्कालीन यंत्रणा व पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. या  ठिकाणी तीन वेळा दरड कोसळून वाहतूक ठप्प  होण्याचे प्रकार घडले होते. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी रात्री ८  वाजण्याच्या सुमारास धामणदेवी जवळ महामार्गावर भलामोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडे वाहनांच्या सुमारे ८ ते १०  किलोमीटर अंतराच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

वाचा : कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र पीएसआय सचिन पाटील यांचा कोरोनाने मृत्यू 

या घटनेची माहिती कशेडी महामार्ग पोलिसांना समजताच त्यांनी पोलादपूर प्रशासन व महामार्ग प्रशासन तसेच एल अँड टी कंपनी यांना माहिती दिली. यावेळी तातडीने पोलादपूरचे नायब तहसिलदार समीर देसाई, पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले.

हायवेचे विक्रम गुंजाळ धायगुडे आणि खेड बाजूकडून कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह सर्व पोलिस टीम घटनास्थळी दाखल झाली होते. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने हालचाली केल्या आहेत. नॅशनल हायवे महामार्ग प्रशासन व एल अँड टी कंपनी यांना ही घटना तातडीने कळवून जेसीबी व पोकलेनच्या साह्याने रात्री उशिरा ९  नंतर दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात केली. ही दरड हटविण्याचे काम गुरुवारी रात्रभर सुरु होते. मात्र, मातीचा मोठा ढिगारा खाली आल्याने शुक्रवार दुपारपर्यंत दरड बाजूला करून महामार्ग सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

वाचा : आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

सदर दरड हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असले तरी शुक्रवारी दुपारी २  वाजेपर्यंत त्यासाठी वेळ लागणार आहे. खेड बाजूकडील वाहतूक इतरत्र  मार्गाने कळवण्यात आली असून महाड बाजूकडील रत्नागिरी दिशेने जाणारी वाहतूक मंडणगड, म्हाप्रल मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेशबंदी असल्याने तुळशी खिंड विन्हेरे  हा पर्यायी मार्ग बंद असल्याने या मार्गाने वाहतूक वळवता आली नाही. त्यामुळे कशेडी घाट परिसरात अडकून राहिलेली खासगी प्रवासी वाहने व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली मोठी वाहने घाटात अडकून राहिली आहेत. यामुळे धामणदेवी ते पोलादपूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून असल्याने वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.