Sun, Sep 20, 2020 06:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदित्य ठाकरेंना सेना नेतेपदी बढती?

शिवसेनेत होत आहेत संघटनात्मक 'मोठे' बदल

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 2:32AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारी महिन्यात शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेतेपदी बढती देण्याच्या हालचालींना पक्षांतर्गत पातळीवर वेग आला आहे. 

पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम शिवसेनेने घोषित केला असून 23 जानेवारीला या निवडणुका होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख (अध्यक्ष), शिवसेना नेते, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि शिवसेना उपनेते या पदावर नव्याने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. संघटनात्मक पातळीवर होत असलेली ही निवडणूक महत्त्वाची आहे. मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके आदी ज्येष्ठ नेत्यांकडे पक्षाचे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सोपविण्यात येऊन नव्या चेहर्‍यांना नेतेपदी संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना नेते रामदास कदम, खा. संजय राऊत, खा. गजाननन कीर्तीकर यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री अनंत गीते, लोकसभा गटनेते आनंदराव अडसूळ, खा. चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे नव्या जबाबदार्‍या सोपविण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी अ‍ॅड. बाळकृष्ण जोशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.