Thu, Aug 13, 2020 17:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धवशिष्टाई निष्फळ; बेस्ट संप चिघळला!

उद्धवशिष्टाई निष्फळ; बेस्ट संप चिघळला!

Published On: Jan 10 2019 10:23PM | Last Updated: Jan 11 2019 1:19AM
मुंबई : प्रतिनिधी 

रात्री उशिरापर्यंत महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्यासोबत चाललेली बैठक निष्फळ ठरली आणि बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार असल्याचे कामागार नेते शशांक राव यांनी जाहीर केले. परिणामी, मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटण्याची कोणतीही आशा नाही. बेस्ट संपाने आता चौथ्या दिवसात पदार्पण केले असून, सर्वत्र प्रवाशांचे हाल सुरू आहेत. 

संपावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सकाळी बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी कुलाब्यातील बेस्ट भवनमध्ये कृती समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. पण या चर्चेत तोडगा न निघाल्यामुळे संप सुरूच ठेवण्यात आला.  त्यानंतर सायंकाळी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट अध्यक्ष आशिष चेंबूरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे व कृती समितीतर्फे शशांक राव यांची बैठक आयोजित करण्यात आली. परंतू ती देखील निष्फळ ठरली.

शशांक राव म्हणाले, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिन करण्याची आमची मुख्य मागणी आहे. महापौर बंगल्यावरील बैठकीत पालिका आयुक्‍तांनी ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. आमच्या एकूणच मागण्यांवर कोणताही प्रस्ताव या बैठकीत आमच्यासमोर मांडला नाही. त्यामुळे संप सुरू ठेवण्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय नाही. बेस्टचा कामगार अत्यंत हालाखीत असून, 10 तारखेनंतर त्याला घरी दूध आणणेदेखील परवडत नाही. या कामगाराचा कोणताही विचार करण्यास प्रशासन तयार नसल्याने जोपर्यंत आम्हाला कोणतेही आश्‍वासन लेखी मिळत नाही तोपर्यंत संप सुरू राहील. आमच्या मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिले आहे. सरकारने अजूनही विचार करावा, असे आवाहनही शशांक राव यांनी केले.

आज बेस्ट कामगार मेळावा

शुक्रवारी बेस्टच्या कर्मचार्‍यांचा मेळावा घेण्यात येणार असून त्यामध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या संपाची व बेस्ट प्रशासन, पालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती ठेवण्यात येणार आहे. कर्मचारीच संपाबाबतची पुढील दिशा ठरवतील,असे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले. महापौरांनी बैठकीला बोलावले होते व आम्हाला या बैठकीत तरी तोडगा निघेल अशी अपेक्षा होती पण आमची निराशा झाली, असेही राव म्हणाले.

बेस्टचे 9 कोटींचे नुकसान

बेस्ट उपक्रमास दररोज प्रवासी वाहतूकीतून दररोज सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. पंरतु गेल्या तीन दिवसांमध्ये एकही बस आगाराबाहेर पडली नाही. त्यामुळे तीन दिवसांचे सुमारे 9 कोटी रूपयाहून जास्त रुपयांचे नुकसान झाले. 

अवघे 4 चालक, 3 वाहक उपस्थित 

गुरूवारी सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त चार चालक व तीन वाहकांनी आगारात हजेरी लावली. अन्य सर्व कर्मचार्‍यांनी आगाराबाहेर निदर्शने करून बेस्ट प्रशासनाचा निषेध केला. नोटीस प्रकरणामुळे कर्मचारी व त्यांच्या पत्नी रस्त्यावर आल्यामुळे कर्मचारी तडजोडीला तयार नसल्याचे दिसून आले.