होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २७ नवोदित क्रिकेटपटूंना गंडा

२७ नवोदित क्रिकेटपटूंना गंडा

Published On: Dec 02 2017 1:30AM | Last Updated: Dec 02 2017 12:50AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल), रणजी ट्रॉफी तसेच परदेशातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंना गंडा घालणार्‍या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून टोळीने आतापर्यंत 27 खेळाडूंना 68 लाख रुपयांना फसवल्याचे उघड झाले आहे.

आयपीएलमधील सनरायझर्स हैद्राबाद संघाला खेळाडू पुरविण्याचे काम काही वर्षांपूर्वी भुसावळचा रहिवासी असलेल्या विजय गोपा बराटे याच्या मालकीच्या आरएन स्पोर्टस क्लबने घेतले होते. क्लब कारनामे समोर येताच हैद्राबाद संघाने वर्षभरातच त्याच्याशी असलेले कंत्राट तोडले. त्यानंतर बराटे याने त्याचे ठाण्यातील साथिदार जीवन मुकादम आणि दिनेश मोरे यांच्या मदतीने उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंना आयपीएलसोबतच रणजी ट्रॉफी तसेच परदेशातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत लुटण्याचा प्लॅन आखला.

सनरायझर्स हैद्राबाद संघातील खेळाडू आणि सामन्यांदरम्यान क्रिकेटशी संबंधीत व्यक्तींसोबत, तसेच पुरस्कार सोहळ्यावेळी काढलेले फोटो दाखवत ही टोळी उदयोन्मुख खेळाडूंना आकर्षित करत त्यांच्याजवळून 10 ते 15 लाख रुपये उकळत होती. पैसे मागण्यासाठी आलेल्या या खेळाडूंना लाच दिल्याच्या गुन्ह्यात अडकवून बदनामी करत क्रिकेटचे करीयर खराब करण्याची धमकी ही टोळी देत होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणीही तक्रार करायला धजावत नव्हता. अशाप्रकारेच या टोळीने चेंबूरमधील एका उदयोन्मुख खेळाडूला गंडा घातला होता.

अखेर चेंबूरमधील या तरुणाने काहींना सोबत घेत मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची भेट घेतली. आयुक्तांच्या आदेशावरुन याप्रकरणी चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत गुन्हे 
शाखेच्या मालमत्ताविरोधी कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रहिमतुल्ला सय्यद, संतोष गायकर, सहायक पोलीस निरीक्षक दिप बने, लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने या अधिकार्‍यांसह पोलीस अंमलदार अनिल सोनावणे, दत्ता कुढले, दत्तात्रय कोळी, चंद्रकांत वलेकर,  सुनील कांगणे, परशुराम माने, किरण जगताप, महेश मोहिते, आत्माराम सोनावणे, आनंदा गेंगे, शैलेश उत्तेरकर यांच्या पथकाने तपास करत भुसावळ, पुणे आणि ठाणे परिसरात छापे टाकून तिघांना अटक केली.