Thu, Jun 04, 2020 07:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'हातावर शिक्का असताना बाहेर फिरणार्‍यांना पोलिसांत द्या'

'हातावर शिक्का असताना बाहेर फिरणार्‍यांना पोलिसांत द्या'

Last Updated: Mar 28 2020 5:36PM

जलसंपदा मंत्री जयंत पाटीलमुंबई : पुढारी वृत्तसेवा

लोकांनी अजूनही कोरोनाची लढाई गांभिर्याने घेतलेली दिसत नाही. अजूनही ते रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत हातावर शिक्का मारून घरात क्वॉरंटाईन करण्याचा सल्ला दिलेला असतानाही जे लोक घराबाहेर सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. त्या लोकांना घराबाहेर फिरताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवा. त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. पाटील यांनी शनिवारी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

कोरोनाचा व्हायरस अत्यंत गंभीर आहे. त्याची जगभरातील आकडेवारी पाहिल्यानंतर हा व्हायरस किती गंभीर असून कोरोनाचं संकट किती भयंकर आहे, हे लक्षात येते, असे ते म्हणाले. 

जगात ५ लाख ९ हजार ६४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. २४ तासांत ४६ हजार ४८४ जणांना कोरोनाची लागण झाली. तर याच २४ तासांत अडीच हजार मृत्यूमुखी पडले आहेत. दुर्दैवाने हे आकडे आपल्याला ऐकायची वेळ आली आहे. भारतात ७२४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ७५ नव्या केसेस आहेत. तर आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासांत ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आपण याबाबत गंभीर आहोत का? याचा अभ्यास करायला हवा, असे ते म्हणाले.

कोरोनाचे संकट टाळायचे असेल, त्याचा बिमोड करायचा असेल, तर घरातच रहा. काही लोक रिलॅक्स होण्यासाठी बाहेर विनाकारण फिरत आहेत. मात्र, पुढचे १४ दिवस आपल्यासाठी गंभीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरातच रहायला हवे. घराबाहेर पडायचे टाळा. घरात बसणे हेच महत्वाचे आहे. कोरोना व्हायरस घालवण्यासाठी सर्व सूचनांचे पालन करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

 कोरोना संपर्क आणि संसर्गाने होतो. त्यामुळे घरातच राहा. बाहेर फिरू नका. अमेरिका, चीन, इटली, स्पेन आणि जर्मनी येथील लोकही घराबाहरे पडत नाहीत. आपल्याला काहीच होणार नाही, असा अती आत्मविश्वास बाळगू नका. काही लोकांना विनाकारन पुढारपण करण्याची सवय असते. त्यांनी पुढारपण करू नये. तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू वाटपाच्या बहाण्याने काही लोक ग्रुप करून बाहेर पडत आहेत. त्यांनीही ग्रुपद्वारे फिरू नये. तुमच्या ग्रुपमधील एखाद्यालाही कोरोनाची बाधा झालेली असू शकते. याचे भाग ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकाने सुरू ठेवली आहेत. बाजारही सुरू आहे. केवळ गैरसोय होऊ नये म्हणून या सुविधा देण्यात आली आहे. एखादी सुविधा देण्यात आली म्हणून झुंबड का करता? असा सवाल करतानाच प्रत्येकाने स्वत:ला शिस्त लावली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तुम्ही स्वत: घराबाहेर फिरू नका, पण हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारलेला व्यक्ती जर फिरताना दिसत असेल तर ताबडतोब पोलिसांना कळवा. प्रशासनाला त्याची माहिती द्या. त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले