Wed, Aug 12, 2020 04:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या १० रुपये थाळीवर आज शिक्कामोर्तब

शिवसेनेच्या १० रुपये थाळीवर आज शिक्कामोर्तब

Last Updated: Dec 14 2019 1:51AM
मुंबई : दिलीप सपाटे 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पंधरवडा झाला असताना या पंधरा दिवसात त्यांची तिसरी मंत्रिमंडळ बैठक आज (ता.१४)  होणार आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी ही मंत्रिमंडळ बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे दहा रुपयांत थाळी योजना सुरू करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.  त्यामुळे शिवसेनेच्या वचननाम्यातील एक आश्‍वासन पूर्ण होणार आहे. परंतु, राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

1995 ला पहिल्यांदा युती सरकार सत्तेवर आले तेव्हा एक रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही योजना अमलात आली तरी ती यशस्वी ठरली नाही. ही केंद्रे काही कालावधीतच बंद पडली. या केंद्रांची जागा चायनीज पदार्थ आणि फास्ट फूडने घेतली.मात्र, शिवसेनेने पुन्हा एकदा दहा रुपयांमध्ये थाळी योजना सुरु करण्याचे वचन राज्यातील जनतेला दिले असून हा मुद्दा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातही आहे. या योजनेवर शनिवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शनिवारी दुपारी दिड वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत दहा रुपयात थाळी योजना सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यभर या योजनेची केंद्र सुरु केली जाणार आहे. मंत्रिमंडळ ही योजना कशी आखते याबाबत उत्सुकता आहे. थाळीचा मेणू काय आणि ती चालविणार्‍यांना कोणते लाभ मिळणार हे देखील स्पष्ट होणार आहे.