Tue, Aug 04, 2020 14:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार 'या' पक्षात प्रवेश

अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार 'या' पक्षात प्रवेश

Last Updated: Jul 04 2020 12:21PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

सध्या राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. पण अशातदेखील राजकारणातील घडामोडी सुरु आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे राजकारणात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रिया बेर्डे यांनी स्वतः हून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिनेसृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणाऱ्या आणि सिनेसृष्टीचा खरा आधार असणाऱ्या लोकांना मदत करण्याचा उद्देश राजकारणात एन्ट्री करण्यामागे असल्याचे बेर्डे यांनी म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया बेर्डे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पुण्यात मार्केट यार्डातील 'निसर्ग' इथल्या पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

सिनेसृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणाऱ्या आणि सिनेसृष्टीचा खरा आधार असणाऱ्या लोकांना मला मदत करायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरू शकतो. यातून मी कलाकारांच्या अडचणी समजू शकते, त्यांना योग्य मदत करू शकते. त्यामुळे मी माझ्या कार्यकिर्दीचा हा नवीन टप्पा सुरू करत आहे अशी प्रतिक्रिया प्रिया बेर्डे यांनी एका वृत्तपत्राला दिली. सध्या प्रिया बेर्डे पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचे काम पहात आहेत. त्यामुळे आपण पुण्यातूनच नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. 

तसेच, बेर्डे यांच्यासह सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.