होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जत येथे विवाहबाह्य संबंधातून प्रेमी युगुलाची आत्महत्या 

विवाहबाह्य संबंधातून प्रेमी युगुलाची आत्महत्या 

Published On: Feb 12 2019 6:33PM | Last Updated: Feb 12 2019 7:00PM
कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कडाव जवळील वडवली येथे विवाहबाह्य संबंधातून युवक सचिन घुडे (वय 32)  आणि विवाहित महिला नम्रता मराडे (वय 30) या दोघांनी दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. या संदर्भात कर्जत पोलिस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सचिन घुडे हा वडवली येथे राहत होता. त्याचे याच गावातील विवाहित महिला नम्रता मराडे हिच्याशी प्रेम संबंध होते. यापूर्वीही हे दोघे असेच घरातून निघून गेले होते, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. त्यामुळे नम्रता हिचा पती सूर्यकांत तिला घेवून पनवेल येथे राहायला गेला होता, मात्र तरीसुद्धा नम्रता ही पुन्हा पनवेल येथून आपला प्रियकर सचिन घुडे याच्याबरोबर पळून गेली होती. 

मंगळवार (दि १२) रोजी सकाळी नऊच्या सुमारास या दोघांचे मृतदेह टाटा भिवपुरी कडे जाणाऱ्या जुन्या रेल्वे मार्गालगत असणाऱ्या उल्हास नदीवरील पुलाखाली आढळला. पुलाच्या लोखंडी रॉडला या दोघांचे मृतदेह नॉयलॉनच्या दोरीने टांगलेल्या अवस्थेत दिसून आले. फिर्यादी रोहीदास घुडे याने कर्जत पोलिसांना या बाबत कळविले. खबर मिळताच पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे व पीएसआय जेठे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचासमोर पंचानामा केला.

वेळेस दोघांजवळून सुसाईड नोट (चिठ्ठी )आढळली. त्यामध्ये आम्ही  दोघे आत्महत्त्या करीत आहोत आमच्या मृत्यू प्रकरणी कोणाला जबाबदार धरू नये असे त्यात लिहले होते. यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांच्या लक्षात आले.