Sun, Jan 24, 2021 20:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकनाथ खडसे किंवा राजू शेट्टी यापैकी एका नावावर फुली?

नामनियुक्‍तीसाठी सरकारकडून राज्यपालांना पंधरा दिवसांचा अवधी, एकनाथ खडसे किंवा राजू शेट्टी यापैकी एका नावावर फुली?

Last Updated: Nov 15 2020 7:34AM
मुंबई : चंदन शिरवाळे

विधान परिषदेवर 12 जणांच्या नामनियुक्‍तीसाठी राज्यातील महाआघाडी सरकारने राज्यपालांना 15 दिवसांचा अवधी दिला आहे. हा कालावधी 21 नोव्हेंबर रोजी संपत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तांत्रिक मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसने शिफारस केलेले सहकार क्षेत्रातील नेते एकनाथ खडसे किंवा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापैकी एका नावावर राज्यपालांकडून फुली मारली जाण्याची शक्यता असल्याची माहिती राजभवनमधील सूत्राने दिली आहे.

कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार यापैकी एका क्षेत्रात योगदान असलेल्या 12 व्यक्‍तींची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्‍ती केली जाते. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने मे-जूनपासून विधान परिषदेच्या या नामनियुक्‍त जागा रिक्‍त आहेत. या जागा भरण्यासाठी आघाडी सरकारने 6 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारशी केल्या आहेत. याबाबतचा बंद लखोटा ज्येष्ठ मंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. 

यामध्ये भाजपला रामराम करून राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतलेले एकनाथ खडसे आणि केंद्र सरकार, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी धोरणावर कडाडून टीका करणारे  राजू शेट्टी या दोघांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे यापैकी एका नावावर राज्यपाल बोट ठेवू शकतात, अशी शक्यता एका अधिकार्‍याने व्यक्‍त केली.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत 7 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यापूर्वी या शिफारशी मंजूर होतील, अशी आघाडीला खात्री आहे. काँग्रेसने सचिन सावंत व रजनी पाटील (सहकार आणि समाजसेवा), मुजफ्फर हुसैन (समाजसेवा), अनिरुद्ध वनकर (कला), राष्ट्रवादीने एकनाथ खडसे व राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा), यशपाल भिंगे (साहित्य), आनंद शिंदे (कला) तर शिवसेनेने उर्मिला मातोंडकर व नितीन बानुगडे पाटील (कला), विजय करंजकर (समाजसेवा)  तर सहकार क्षेत्रातून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस केली असल्याचे समजते.

यामधील अकरा नावांना राज्यपालांचा आक्षेप नसेल; मात्र शेट्टी किंवा खडसे यापैकी एका नावावर फुली मारली जाणार असल्याची शक्यता आघाडी सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्यानेही व्यक्‍त केली  आहे. आघाडी सरकारला 12 पैकी 11 नावांच्या शिफारशींना राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका नावासाठी राज्यपालांकडे जोर लावला जाणार नसल्याची माहिती या मंत्र्याने दिली. मात्र, या नावासाठी  राज्यपालांकडे पुन्हा आग्रह धरला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.