Thu, Aug 06, 2020 03:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमधील गटबाजी सहन झाली नाही'

'उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमधील गटबाजी सहन झाली नाही'

Published On: Sep 11 2019 1:35PM | Last Updated: Sep 11 2019 1:43PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

उर्मिला मातोंडकर यांनी काल, मंगळवारी आपल्या काँग्रेसच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे कारण पुढे आले आहे. यावर आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील पक्षातील गटबाजीवर बोट ठेवले आहे.

उर्मिला मातोंडकर पक्षांतर्गंत गटबाजीला कंटाळल्या. सर्वच पक्षामध्ये गटबाजी असते. मात्र, मातोंडकर राजकीय व्यक्ती नसल्याने त्यांना पक्षातील गटबाजी सहन झाली नाही, असे तांबे यांनी म्हटले आहे. त्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्ती आहेत. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे त्यांची वैचारिक एकनिष्ठता दिसून येते. मातोंडकर आता काँग्रेसमध्ये नसल्या तरी युवक काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहून आपली नाराजीही व्यक्त केली होती. या पत्रात त्यांनी संजय निरूपम यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेतील आपल्या पराभवासाठी काँग्रेसमधीलच काही नेते जबाबदार असल्याचेही उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीपूर्विच मार्चमध्ये उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. 

दरम्यान, युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ६० जागांची मागणी केली असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज दिल्लीतील युवक काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली, असेही त्यांनी सांगितले.