नवी दिल्ली : पुढारी वत्तसेवा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस छाननी समितीची बैठक राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे. या बैठकीमध्ये मुंबईमधील १९ जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. छाननी समितीची बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बैठकीमधील तपशील दिला.
थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये काँग्रेस २५ जागांवर शड्डू ठोकणार आहे. यामधील १९ जागांवरील उमेदवारही निश्चित करण्यात आले आहेत. छाननी समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. थोरात पुढे म्हणाले, की काँग्रसने मुंबईमध्ये राष्ट्रवादीसाठी ६ जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एक जागा समाजवादी पक्षाला सोडण्यात आली आहे.
थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार छाननी समितीची पुढील बैठक १४ सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीमध्ये निश्चित झालेल्या नावांची घोषणा केली जाऊ शकते. उद्या (ता.१२) सार्वजनिक गणेश विसर्जन झाल्यानंतर राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नावे लवकर घोषित केली जाणार आहेत.
युवक काँग्रेसकडून ६० जागांची मागणी
दरम्यान, राज्यातील आगामी निवडणुकीमध्ये युवक काँग्रेसकडून ६० जागांची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राज्यातील २८८ जागांपैकी ६० जागांवर युवा चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केली. राज्यात काँग्रेसचा विस्तार होण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा झाल्याचे तांबे यांनी नमूद केले. पक्षातील ज्येष्ठ नेते काँग्रेस सोडून जात आहेत. त्यामुळे युवा नेत्यांना पुढे आणले पाहिजे. पहिल्यांदा तसेच दुसऱ्यांदा मतदान करत असलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी युवा नेत्यांना संधी गरजेचे असल्याचे तांबे यांनी सांगितले. या मुद्यावरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे तांबे यांनी नमूद केले.