आरेची कत्तल थांबवू शकले नाहीत, आणि 'ते' म्हणतात आम्हाला सत्ता द्या जंगल घोषित करू'

Last Updated: Oct 10 2019 9:19PM
Responsive image
राज ठाकरे

Responsive image

गोरेगाव  : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडला. आज (ता. १०) त्यांनी पहिल्या सभेत  विधानसभेच्या रणांगणात येण्याची भूमिका स्पष्ट केली. सभेला उशीर झाल्याने त्यांनी पहिली सभा आटोपती घेतली. त्यांची  दुसरी सभा गोरेगावमध्ये झाली.

राज यांनी या सभेतून माझ थोबाड थांबणार नाही या वाक्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, आरेत २७०० झाडं कापली, आणि न्यायालयं देखील सरकारला साजेसं निर्णय देतं, बरं सरकारचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे होते, ते ही कत्तल थांबवू शकले नाहीत आणि शिवसेनाप्रमुख म्हणतात की आम्हाला सत्ता द्या आम्ही आरेला जंगल घोषित करू. आम्हाला मूर्ख समजता का? अशी विचारणा राज यांनी केली. 

काय झालं शिवस्मारकाचं? अहो ह्या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास पण आहे पण ह्या इतिहासाला म्हणजे आपल्या गडकिल्ल्याना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहेत, तरीही माध्यमं, आणि लोकं थंड बसलेत असा घणाघात राज यांनी केला.

राज ठाकरेंचा घणाघात 

आज महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या ३७० कलमबद्दल बोलत आहेत; ३७० कलम काढल्याबद्दल अभिनंदन, पण आमच्या महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध? आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार? आमच्या बेरोजगार तरुणांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी कधी बोलणार?

आज मुंबईत, ठाण्यात वाट्टेल ती लोकं येऊन राहत आहेत, ती कुठून येत आहेत, काय करत आहेत ह्याचा सरकारला पत्ता नाही. पाकिस्तान, बांग्लादेशमधून आलेल्या घुसखोरांचे मोहल्लेच्या मोहल्ले उभे राहतात आणि सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही, पण आमच्या सणांना सरकार विरोध करतं, बंधनं आणतं

बुलेट ट्रेनला मी एकट्याने विरोध केला. मेट्रोच्या कार शेडसाठी मी जागा सुचवली होती, आरेत कर शेड नको ह्यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला होता. सरकारला सांगितलं होतं की जिथून मेट्रो सुरु होत आहे तिथे कार शेड करा. पण सरकारला कोणाच्या घशात ती जागा, बीपीटीची जागा घालायची आहे?

ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी, आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल 

जाहीरनामे येणार आणि जाणार, तुम्ही भूलथापांना बळी पडणार... तुमच्या मनात राग आहे का नाही? तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? सरकार म्हणतंय की आम्ही १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या. मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत त्या खड्डयांना मुख्यमंत्री 'विहिरी' म्हणत आहेत का? काय बोलतंय सरकार? आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहे.

विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षात जाऊन बसतोय, नेते इकडून तिकडे सहज उड्या मारत आहेत, आणि आपण सगळे शांतपणे बघत बसलोय. तुमच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट कोण निवडून येणार आहे ह्यावर सगळं अवलंबून आहे. 

काय झालं शिवस्मारकाचं? अहो ह्या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास पण आहे पण ह्या इतिहासाला म्हणजे आपल्या गडकिल्ल्याना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहेत, तरीही माध्यमं, आणि लोकं थंड बसलेत. 

उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकार थंड आहे कारण कोणी काही बोलत नाहीये.