औरंगाबादनंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून उस्मानाबादचेही नामांतर?, आधी धाराशीव नंतर उस्मानाबाद...

Last Updated: Jan 13 2021 8:04PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने अधिकृतरित्या केलेल्या ट्विटचा सरळ अर्थ काढला तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर मुख्यमंत्री कार्यालयाने आधीच केल्याचे म्हणता येते. मात्र, हे ट्विट पडताच सत्तारूढ महाराष्ट्र विकास आघाडीत नामांतराचे राजकारण पेटू लागल्याचे चित्र आहे. 

बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धाराशीव-उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनियम १९९८ मध्ये सुधारणा या संदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ट्विट करताना मुख्यमंत्री कार्यालयाने आधी ‘धाराशीव’ असा उल्‍लेख केला आणि त्यानंतर उस्मानाबाद लिहिले. या ट्विटमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे छायाचित्रही मुख्यमंत्री कार्यालयाने वापरले. मुख्यमंत्री कार्यालयानेच उस्मनाबादचा उल्‍लेख धाराशीव असा केल्याने आता पुन्हा एकदा नामांतरणाचा वाद उफाळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, अशाच प्रकारे मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर औरंगाबादच्या नावा उल्लेख संभाजीनगर असा केला होत्या. त्यावेळीही अशा प्रकारचे एक ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले होते. त्यावेळी औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसकडून विरोध केला होता. 

महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असे थोरात यांनी सुनावले.  मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने हे ट्विट करणार्‍या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला देखील महसूल मंत्र्यांनी खडे  बोल सुनावले होते.