Fri, Sep 25, 2020 11:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणानुसार बांधकाम विभागात ५२ जणांना नियुक्त्या

मराठा आरक्षणानुसार बांधकाम विभागात ५२ जणांना नियुक्त्या

Published On: Jul 12 2019 10:27PM | Last Updated: Jul 12 2019 10:26PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेल्या 13 टक्के आरक्षणानुसार  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील ३४ पुरुष १६ महिला आणि दोन खेळाडूंना  नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यापैकी ३४ जणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण अंमलबजावणीसंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम खाते हे मराठा आरक्षणाची राज्यात प्रथम अमंलबजावणी करणारा विभाग ठरला आहे. 

मराठा समाज आरक्षण कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू झाल्यानंतर शासनाने हा महाभरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली.  न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये एसईबीसी प्रवर्गातून १३ टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ३०० पदांचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील ३४ पुरुष,  १६ महिला आणि दोन खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी ३४ जणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.

राज्यात मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण लागू झाल्यानंतर सुरू केलेल्या भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठीच्या भरती  प्रक्रियेमध्येही मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील इतर रिक्त पदे देखील तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु आहे, असे सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.