Wed, Jan 27, 2021 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोअर परळ ‘पब’चे माहेरघर!

लोअर परळ ‘पब’चे माहेरघर!

Published On: Dec 31 2017 8:28AM | Last Updated: Dec 31 2017 8:13AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून वाटचाल करणार्‍या लोअर परळ या भागात आता पब आणि रेस्टॉरंट बारची संख्या वाढत आहे. अलीकडे या भागाला पबचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेमुळे येथील पब आणि रेस्तराँ बारमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. एकट्या लोअर परळ भागात तब्बल 200 ते 250 पब व रेस्टॉरंट बार असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

रघुवंशी मिल कंपाऊंडमध्ये 2012 मध्ये कोर्ट कमिशनर बसवण्याचे आदेश होते. याठिकाणी बांधकाम स्थगितीचे आदेश असूनही या परिसरात पब, हुक्कापार्लर, रेस्टॉरंट बार आदी सुरू आहेत. यामध्ये फुटबॉल टर्फही बांधले आहेत. या भागात आग लागली तर एक फायर इंजिनही फिरू शकणार नाही एवढी चिंचोळी जागा आहे. याकडे दुर्लक्ष करत, येथील बांधकामांवर महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोटक यांनी केला. कमला मिलमधील इमारतींमध्ये केलेल्या बांधकामांसंदर्भात आपण ऑगस्टमध्ये इमारत प्रस्ताव विभागाकडे याबाबतची माहिती मागवली होती, परंतु ही माहिती देताना महापालिकेने या सर्वांना परवानगी दिलेली असून त्यांना बांधकामाचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. आपल्या पत्रानंतर एका माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी माहिती मागवली. त्याला मात्र, वन अबाव्ह येथील बांधकामात मोकळ्या जागेवर कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी दिली नसल्याचे सांगितले. तसेच कमला मिलमध्ये कोणत्याही बांधकामांना मोकळ्या जागेत बांधकाम करण्याची परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे.

कमला मिल कंपाऊंडमध्ये सुमारे 84 ते 85 हॉटेल, पब आहेत. त्यामुळे येथे येणार्‍या श्रीमंतांच्या वाहनांमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी वरळीत मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते. यापुढे कुठल्याही हॉटेल, पबला 396 अंतर्गत परवाना दिला जाऊ नये, अशी मागणी आपण एप्रिल 2016 पासून पालिका आयुक्तांकडे केली होती. परंतु नगरसेवकांच्या मागणीला विचारात न घेता अशाप्रकारचे परवाने दिले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी केला.  लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडसह तोडी कंपाऊंड, मातुल्य मिल कंपाऊंड तसेच रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पब व रेस्टॉरंट बारमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. विशेष म्हणजे याला पालिका व पोलीस अधिकार्‍यांचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्यामुळे आतापर्यंत या पबवर कारवाई झालेली नाही. या मिलमधील 200 ते 250 पबमधील 15 प्रकरणे आपल्या हाती असून या पबमध्ये सरासरी 20 हजार ते 30 हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी केला.