Thu, Sep 24, 2020 10:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय

कल्याण : ठाकुर्ली स्मशानभूमीला टाळे, नागरिकांची गैरसोय

Last Updated: Jan 29 2020 9:55PM
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चोळे-ठाकुर्लीकरांच्या सोयीकरिता स्मशानभूमी उभारली आहे. मात्र काही लोकांनी हटवादीपणा करून या स्मशानभूमीला टाळे ठोकल्याने तेथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहाची विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आला.

या भागात राहणाऱ्या जिलेबीबाई शर्मा (वय ७२) या महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी झाली. घरची मंडळी, नातलग, आसपासच्या रहिवाशांनी अंत्ययात्रा काढून हा मृतदेह केडीएमसीच्या ठाकुर्ली-चोळगाव तलावाजवळील स्मशानभूमी समोर आणला. मात्र, या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला ठोकलेले टाळे पाहून अंत्ययात्रा काढणाऱ्यांनी मृतदेह तेथेच खाली ठेवला. प्रवेशद्वाराला लावलेल्या टाळ्याची चावीचा शोध घेण्यात आला. मात्र, ज्याच्याकडे चावी आहे त्याने चावी देण्यास नकार दिल्याने मृतदेह जवळपास दोन तास तेथे पडून होता. 

नातेवाईकांनी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही आमच्याकडे चावी नसल्याचे सांगून हात झटकले. त्यामुळे नातेवाईक संतापासह चिंताही व्यक्त करताना आढळून आले. आता या मृतदेहाचे करायचे काय? असा प्रश्न या नातेवाईकांना पडला होता. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नातेवाईकांवर बिकट प्रसंग उभा राहिला होता. मृतदेहाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. भाजपा ओबीसी सेलच्या ठाकुर्ली विभागाचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी घटनास्थळी येऊन नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर अखेर संतप्त नातेवाईकांनी स्मशानभूमीला ठोकलेले टाळे तोडून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

केडीएमसी प्रभाग क्रमांक ४७ च्या भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी यांचे पती श्रीकर चौधरी यांनी मृत नातेवाईकांना चावी देण्यास नकार दिला. झोपडपट्टीत राहणारी जिलेबीबाई शर्मा या महिलेचा मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये गँगरिंगच्या आजाराने मृत्यू झाला. मात्र, मुंबईहून मृतदेह आणायला उशीर झाला म्हणून नगरसेविकेच्या पतीने सदर स्मशानाला टाळे ठोकले, अशी माहिती भाजपाच्या ओबीसी सेलचे मंडळ पदाधिकारी संजय चौधरी  यांनी दिली.

 "