Sat, Jul 11, 2020 09:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

Last Updated: Jul 01 2020 10:18AM

गेल्या वर्षीची लालबागच्या राजाची गणेशमुर्तीमुंबई : पुढारी ऑनलाईन

लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी रक्तदान आणि प्लाझ्मा दान असे उपक्रम आयोजित करुन आरोग्योत्सव साजरा केला जाईल, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

वाचा : कोरोनाचा कहर : ठाणे जिल्ह्यात 1484, मुंबईत 903 तर राज्यात 4878 नवे रुग्ण

मंडळाची बैठक रात्री उशीरापर्यंत चालली. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान प्लाझ्मा दान कण्याचे आवाहन केले जाईल, असे मंडळाने म्हटले आहे.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये देण्याचा निर्णयही घेतला असल्याचे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
मंडळाने याआधीच शासन घेईल तो निर्णय मान्य असेल, अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ४ फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले. त्यावर अनेक मंडळाची पूजेची मूर्ती उंच असल्याने त्यात बदल करण्याबाबत चर्चा सुरू होत्या. याउलट उत्सव मूर्ती आणि पूजेची मूर्ती बसवणार्‍या मंडळांनी यंदा उंच असलेली उत्सव मूर्ती रद्द करत फक्त पूजेची छोटी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाचा : अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सुरू

देशाच्या विविध भागांतून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक येतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.