अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे, पण धोका कायम : शक्तीकांत दास

Last Updated: Nov 26 2020 7:57PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे, पण धोकाही कायम असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी फॉरेन एक्सचेंज डीलर्स एसोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफईडीएआय) वार्षिक समारंभात सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दास यांनी हे मार्गदर्शन केले. 

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी दर उणे 23.9 टक्के इतका नोंदविला गेला होता. मात्र त्यांनंतर अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे दास यांनी नमूद केले. आम्ही जो अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने अर्थव्यवस्था सावरत असल्याचे सांगून ते म्हणाले की, अर्थव्यवस्था सुधाराची ही गती कायम ठेवणे आवश्यक आहे. तिसऱ्या तिमाहीत सुधारणांची जास्त शक्यता असली तरी गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. 

कोरोना संकटामुळे जगभरातील अर्थव्यवस्था गोत्यात येण्याचा धोका आहे, अर्थातच भारत जगापासून वेगळा नाही, असे सांगत दास म्हणाले की, सणासुदीच्या काळात उत्पादने व सेवांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ही मागणी तसेच पुरवठ्याचे चक्र पुढील काळातही चालू राहणे गरजेचे आहे. यासाठीच रिझर्व्ह बँकेने मागणी वाढण्यावर तसेच स्थिरतेवर लक्ष केंद्रित केलेले आहे.